होमपेज › Marathwada › हिंगोलीत सहाव्या दिवशीही आंदोलन सुरूच

हिंगोलीत सहाव्या दिवशीही आंदोलन सुरूच

Published On: Jul 30 2018 1:30AM | Last Updated: Jul 29 2018 10:19PMहिंगोली : प्रतिनिधी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यात सहाव्या दिवशीही रविवारी (दि.29) चार ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आतापर्यंत महामंडळाच्या बस रस्त्यावर न आल्याने प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. तसेच बस अभावी ग्रामीण भागातून शाळा, महाविद्यालयात जाणार्‍या विद्यार्थ्यांसमोर अडचणी निर्माण होत आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यात गेल्या सहा दिवसांपासून रास्ता रोको, मोर्चे, ठिय्या आदी आंदोलन केली जात आहेत. दरम्यान, सहाव्या दिवशी रविवारी (दि.29) जिल्ह्यात सेनगाव तालुक्यातील सुलदली, वसमत तालुक्यातील आडगाव रंजे व बळेगाव फाटा तसेच हिंगोली तालुक्यातील आंबाळा अशा चार ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर टायर, गवत जाळल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती. विशेष म्हणजे सहाव्या दिवशीच्या आंदोलनात रास्ता रोको शिवाय इतर अनुचित प्रकार घडला नाही, मात्र जिल्ह्यात सर्वत्र तणावपूर्ण शांतता असून सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आल्याने छावणीचे स्वरूप आले आहे.

हिंगोली : तालुक्यातील आंबाळा फाटा येथील हिंगोली-वाशिम रस्त्यावर आंदोलनकर्त्यांनी सकाळी दोन ते तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, यासह आदी मागण्यांचे निवेदन हिंगोली ग्रामीण पोलिस अधिकार्‍यांना आंदोलनकर्त्यांच्या वतीने देण्यात आले. आंदोलनकर्ते रस्त्यावर ठाण मांडून बसल्याने रस्त्याची वाहतूक काही तास खोळंबली होती. 

सेनगाव : तालुक्यातील सुलदली येथे सकल मराठा समाजबांधवांच्या वतीने सकाळच्या सुमारास टायर जाळून रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी एक मराठा लाख मराठाच्या घोषणांनी परिसर दणानून गेला. त्यामुळे ग्रामीण भागातून शहरी भागाकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. दरम्यान, काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या प्रसंगी आंदोलनकर्त्यांच्या वतीने मराठा आरक्षण तत्काळ मिळावे तसेच अन्य मागण्यांचे निवेदन पोलिस प्रशासनाला देण्यात आले.

वसमत : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी वसमत तालुक्यातील बळेगाव फाट्यावर परभणी-वसमत रोडवर सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने सकाळी 11 ते 11.30 या दरम्यान रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सदर रास्ता रोकोसाठी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी मंडळ अधिकार्‍यांना निवेदन देण्यात येऊन आंदोलनाची सांगता झाली. तसेच आडगाव रंजे येथेही रास्ता रोको सकाळी 11.10 ते 12.05 या दरम्यान आंदोलन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार जैस्वाल यांना निवेदन देऊन आंदोलनाची सांगता झाली. या वेळी दोन्ही ठिकाणी उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकिरण काशिद, सपोनि गुलाब बाचेवाड, पोउपनि मूलगीर, शेख खूदुस, मिसाळ, गणेश लेकुळे, सिद्दीकी, परसावळे, भोंग, गजभार, चाबुकस्वार, विभुते, वळसे, गुट्ठे, नय्यर, पवार, चव्हाण, ठाकूर, कादरी, नजान, काळे, मोरे आदींचा चोख बंदोबस्त होता.