Sun, Jul 21, 2019 07:58होमपेज › Marathwada › मराठा आरक्षण : २ बसेसवर दगडफेक, धरणे आंदोलन सुरूच

मराठा आरक्षण : २ बसेसवर दगडफेक, धरणे आंदोलन सुरूच

Published On: Jul 23 2018 1:09AM | Last Updated: Jul 22 2018 11:29PMमानवत : प्रतिनिधी

मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नाचे पडसाद 22 जुलै रोजी मानवत तालुक्यात उमटले. तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले असून सलग दुसर्‍या दिवशी राष्ट्रीय महामार्गावरील रत्नापूर येथे बसवर दगडफेक करण्यात आली.

राष्ट्रीय महामार्गावरील रत्नापूर येथील प्रस्तावित टोलनाक्याजवळ  रविवारी सकाळी 11.20 वाजता  पाथरी आगाराच्या परभणी -पाथरी बस (क्रमांक एम.एच. 20 बी.एल. 3501)वर चार अज्ञात युवकांनी दगडफेक केली. यात समोरील व पाठीमागील काच गजाने वार करून फोडण्यात आली तर दोन्ही बाजूच्या 8 खिडक्यांच्या काचा दगडफेक करून फोडण्यात आल्या. यात बसचे  50 हजारांचे नुकसान झाले आहे.याबाबत मानवत पोलिस ठाण्यात चार अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे शनिवारी सायंकाळी देखील याच ठिकाणी बस (क्र. एम.एच. 20 बी.एल. 2853 )  परभणीहून माजलगावकडे जात असताना दगडफेक करण्यात आली. या दोन्ही दगडफेकीच्या प्रकरणात बस ालक प्रल्हाद अवचार आणि गणपती जाधव यांच्या फिर्यादीवरून मानवत ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तहसीलवर मोर्चाही धडकला

दुसर्‍या बाजूला मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावर आंदोलनाची रुपरेषा निश्‍चित करण्यासाठी झालेल्या बैठकीत बेमुदत काळासाठी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.शिवाजी महाराजांच्या नियोजित स्मारकापासून तहसीलपर्यंत मोर्चा काढण्यात आला. संभाजी बिग्रेडचे तालुकाध्यक्ष गजानन बारहाते,उपसभापती पंकज आंबेगावकर,नगरसेवक दीपक बारहाते,किरण बारहाते, सर्जेराव देशमुख, युवा सेना तालुकाधिकारी संतोषराव जाधव आंबेगावकर,अ‍ॅड.ऋषीकेश बारहाते, श्रीकांत देशमुख,संतोष बारहाते, स्वप्निल शिंदे, कृष्णा शिंदे, गोविंद घांडगे हजर होते.

पाथरीत चौथ्या दिवशीही आंदोलन 

पाथरी : मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी पाथरी तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले असून धरणे आंदोलनाचा दि.22 जुलै चौथा दिवस होता. चौथ्या दिवसी धरणे आंदोलनात महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.भर पावसातही धरणे आंदोलनाची तीव्रता वाढताना दिसून येत आहे. नियोजनबद्ध व शांततेने सुरू असलेल्या  आंदोलनाला समाजबांधवांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. आता या आंदोलनात महिलाही उतरल्या आहेत.