Tue, Nov 20, 2018 04:04



होमपेज › Marathwada › मराठा आरक्षण : उस्मानाबादेत सहाजणांचा आत्मदहनाचा प्रयत्न

मराठा आरक्षण : उस्मानाबादेत सहाजणांचा आत्मदहनाचा प्रयत्न

Published On: Aug 21 2018 1:37AM | Last Updated: Aug 21 2018 12:28AM



उस्मानाबाद : प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण देण्याबरोबरच आंदोलकांवरील गुन्हेही तात्काळ मागे घ्यावेत या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेच्या सहा पदाधिकार्‍यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी सकाळी नऊपासूनच छत्रपती शिवाजी चौकात तगडा बंदोबस्त तैनात केला होता. या संघटनेतर्फे गेल्या आठवड्यात तेरणा धरणात जलसमाधीचाही इशारा दिला होता. तिथेही पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. 

दरम्यान, या संघटनेने जिल्हाधिकार्‍यांना 13 ऑगस्ट रोजी निवेदन देऊन मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती. याशिवाय सरकारने आरक्षण देण्याचा शब्द पाळण्याचीही मागणी केली होती. 

या मागण्या मान्य न झाल्यास 20 ऑगस्टला शहरातील शिवाजी महाराज पुतळा चौकात आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे आनंदनगर पोलिसांनी या चौकात सकाळी 9 पासूनच मोठा फौजफाटा तैनात केला होता. अग्निशमन दलाचा बंबही दाखल झाला होता. साध्या वेशातील पोलिसही तैनात केले होते.

साधारण 12 वाजण्याच्या सुमारास आंदोलक चौकात आले. यावेळी पावसाची रिपरिपही सुरु होती. तशाही अवस्थेत सहाजणांनी अंगावर रॉकेलचे डबे ओतून घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, तिथे अगोदरच नजर ठेवून असलेल्या पोलिसांनी अक्षरश: झडप घालत सहाजणांच्या हातातील डबे हिसकावून घेत त्यांना ताब्यात घेतले. यावेळी आंदोलक आणि पोलिसांत झटापट झाली. तातडीने पोलिसांनी सहाहीजणांना ताब्यात घेऊन पोलिस ठाणे गाठले. संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष विष्णू कोळी, जिल्हाध्यक्ष काकासाहेब राऊत, कार्याध्यक्ष अमर शेख, उपाध्यक्ष अनिल माने, शशिकांत पाटील, आकाश जेधे अशी या आंदोलनकर्त्यांची नावे आहेत.