Thu, Apr 25, 2019 13:24होमपेज › Marathwada › मराठा आरक्षण आंदोलन: ३ बसेस फोडून रास्ता रोको

मराठा आरक्षण आंदोलन: ३ बसेस फोडून रास्ता रोको

Published On: Jul 22 2018 1:01AM | Last Updated: Jul 21 2018 10:43PMहिंगोली/जवळाबाजार/सेनगाव : प्रतिनिधी

परळी येथे दि.18 जुलैपासून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठोक मोर्चात मराठा समाजबांधव आरक्षणासाठी ठाण मांडून आहेत. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून दि.21 जुलै  हिंगोली येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यांतून आंदोलनात सहभागी झालेल्या हजारो समाजबांधवांनी सरकारविरुद्ध रोष व्यक्त केला. तसेच आंदोलना दरम्यान बसेसही फोडण्यात आल्या.

शनिवारी सकाळी 11 ते 4 दरम्यान धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी अनेकांची  भाषणे झाली. यानंतर मराठा क्रांती मोर्चा शांततेच्या मार्गाने न्याय मागणार नसून तालुका व गावपातळीवर प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता आंदोलन केले जाईल, असा इशाराही आंदोलकांनी यावेळी दिला. आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं अशी घोषणाबाजी केल्याने जिल्हा कचेरी परिसर दणाणला. मराठा समाजाला शासनाने शब्द दिल्याप्रमाणे तत्काळ आरक्षण जाहीर करावे. तसेच मराठा क्रांती मोर्चात समाविष्ट असलेल्या इतर मागण्याही निकाली काढाव्यात, अशी मागणी करण्यात आली.  निवासी उपजिल्हाधिकारी लतीफ पठाण यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.  हजारो समाजबांधव उपस्थित होते. सर्वच राजकीय नेते मंडळी,  सामाजिक संघटना यांच्यासह इतर समाजबांधवांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला. 

जवळाबाजार : मराठा आरक्षणासह इतर प्रलंबित प्रश्‍नांसाठी जवळाबाजार येथे शनिवारी  परभणी-हिंगोली महामार्गावर रास्ता रोको  करून शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. दवाखाने व औषधी दुकाने वगळता सर्व दुकाने बंद होती. बसस्थानक परिसरात मराठा समाजातर्फे  एक तास रास्ता रोको करून पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले. याच मार्गावर टायर जाळण्याचा प्रयत्न झाला.

त्यानंतर परभणीकडून हिंगोलीकडे जाणार्‍या बसेस व इतर वाहने विद्युत उपकेंद्राजवळ रोखण्यात आली. आंदोलकांनी तीन बसेसवर दगडफेक केली. परभणी-हिंगोली महामार्गावर आंदोलनकर्ते ठाण मांडून बसल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. औंढा : तालुक्यातील येहळेगाव सोळंके येथे कळमनुरी आगाराच्या हिंगोली-परभणी बस क्र.एमएच 20 बीसी 0557 या बसवर शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास अज्ञात जमावाने दगडफेक केली. यामध्ये सुर्दैवाने प्रवाशांना इजा झाली नाही. या घटनेनंतर जमाव पळून गेला. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्यासह फौजफाटा घटनास्थळी पोहोचला. चालक बाबाराव दिंडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात जमावाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.