Thu, Apr 18, 2019 16:38होमपेज › Marathwada › मराठा आरक्षण : गोदावरीत आंदोलकांनी घेतल्या उड्या

मराठा आरक्षण : गोदावरीत आंदोलकांनी घेतल्या उड्या

Published On: Jul 29 2018 1:45AM | Last Updated: Jul 29 2018 1:42AMपूर्णा : प्रतिनिधी

सकल मराठा बांधवांच्या वतीने शनिवारी पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथील गोदावरीच्या पात्रात  आंदोलन करण्यात आले.  या ठिकाणी 50ते 60 आंदोलकांनी जलाशयात उड्या घेतल्या होत्या. त्यांना जलसुरक्षकांनी पाण्याबाहेर काढले.

यावेळी प्रशासनाने बचावासाठी  वेळीच या आंदोलकांची  मनधरणी केली.   या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर   प्रशासनाने जोरदार तयारी केली होती. तहसीलदार श्याम मदनूरकर हे स्वतः तेथे उपस्थित होते.  सर्व आंदोलकांना सुखरुप  बाहेर काढण्यात आले. बोट, जाकीट, पट्टीचे पोहनारे तसेच आपत्ती व्यवस्थापन पथक तयार होते. पूर्णा नगर परिषदेच्या रेस्क्यू टिमने  महत्त्वपूर्ण  भूमिका बजावली.   यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, कात्नेश्वर, लक्ष्मीनगर,पूर्णा टी पॉइंट ,चुडावा, गौर, झिरोफाटा या ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आले. पूर्णा शहर कडकडीत बंद होते. शहरातील शाळा व महाविद्यालये सोडून देण्यात आले. तसेच  परभणी रस्ता, कात्नेश्वर, झिरोफाटा, लक्ष्मीनगर या मार्गावर मोठमोठे झाडे टाकून व टायर जाळून वाहने अडविण्यात आली.

ठिकठिकाणी रास्ता रोको

पूर्णा - नांदेड मार्गावरील चुडावा येथे झाडे टाकून आंदोलन करण्यात आले. तर गौर येथे  झाडे टाकून व टायर जाळून सकल मराठा क्रांती ठोक मोर्चा समितीने रास्ता रोको करून शासनविरोधी घोषणा देऊन निषेध केला.  मराठा आरक्षण मिळावे, वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनाच्या वेळी क्रांती मोर्चाचा आंदोलकावर  लाठीमार झाला व त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल झालेले गुन्हे मागे घेण्या संदर्भात  लेखी निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. याप्रसंगी चुडावा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.