Wed, Aug 21, 2019 15:01होमपेज › Marathwada › मराठा आरक्षण : जिल्हाभरात चक्‍का जाम आंदोलन

मराठा आरक्षण : जिल्हाभरात चक्‍का जाम आंदोलन

Published On: Jul 29 2018 1:45AM | Last Updated: Jul 29 2018 1:45AMपरभणी : प्रतिनिधी

मराठा आरक्षण आंदोलन करणार्‍या समाजबांधवांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ 28 जुलै रोजी जिल्हाभरात चक्‍का जाम आंदोलन करण्यात आले. 

जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलनाचा भडका झाला असल्याने परभणी शहरात या आंदोलनाची अतितीव्रता संतापजनक पध्दतीने  पाहवयास  मिळाली. यात  रोष असलेल्या प्रत्येक घटकांवर आंदोलकांनी तुफान दगडफेक केली. यात विशेषतः नवा मोंढा पोलिस, स्थागुशा, वाहतूक शाखेच्या कर्मचार्‍यांना आंदोलकांनी लक्ष्य केले. आ.मोहन  फड यांच्या मालकीचा असलेल्या वसमत रोडवरील इंडियन ऑईल कंपनी पेट्रोल पंप व काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस इरफानूर रहेमान खान यांचा आर.आर. पेट्रोलपंप व एका सरफा दुकानावर दगडफेक करण्यात आली. दरम्यान, युवकांची टोळके हातात दगड घेऊन रस्त्यावर उतरले असल्याने वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना  परिस्थितीची कार्यालयात बसूनच माहिती घ्यावी लागली.  

सकाळी 9 वाजल्यापासून रास्ता रोको आंदोलनास प्रारंभ झाला. दरम्यान शहरातील व्यापार्‍यांनी मागील तीन दिवसांप्रामणे आजही दुकाने बंद ठेवली. विसावा कॉर्नर, बसस्टँड परिसरात आंदोलकांच्या टोळक्यांनी सरकार विरोधात घोषणा देऊन लाठीचार्ज करणार्‍या पोलिसांचा निषेध केला, मात्र वसमत रस्त्यावर आंदोलनास हिंसक वळण लागले. खानापूर फाटा परिसरात युवकांचे ठिय्या आंदोलन सुरू असताना याच रस्त्यावरील काळी कमान, शिवशक्‍ती इमारत, आहुजा कॉम्प्लेक्स, शिवाजी कॉलेज  परिसर आदी ठिकाणी युवकांनी टायर जाळले. दुकांची बॅनर बॅरेकेटस रस्त्यावर अडवले लावली. याचवेळी पेट्रोलिंग करत असलेल्या पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर दगडफेक करून आंदोलकांनी पोलिसांना पळवून लावले. 

आहुजा कॉम्प्लेक्ससमोर नवामोंढा पोलिस ठाण्याचे निरीक्षक नरसिंग ठाकूर स्वतः आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन करत असताना जमावाने त्यांच्यावर दगडफेक केल्याने त्यांना परतावे लागले. दरम्यान या सर्व घटनेते आंदोलकांचा पोलिस प्रशासनावर संताप असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिस प्रशासनास या आंदोलनात कोणताही इतर हस्तक्षेप करून ते नियंत्रणात ठेवणे कठीण झाले. परिणामी वरिष्ठ अधिकार्‍यांनी दबाव तंत्राचा वापरही करणे टाळल्याने आंदोलन सुरू राहिले अन् परिस्थिती बिघडत गेली.

जखमी पोलिसांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू ः टाकळी कुंभकर्ण शिवारात शनिवारी दुपारी जमावाने केलेल्या हल्ल्यात पोलिस अधिकारी व कर्मचारी जखमी झाले. त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आंदोलनादरम्यान जमावाने पोलिसांना अडविले. त्यांना वाहनातून खाली उतरवून हल्ला करण्यात आला. यात लाठ्या - काठ्या व दगडांचा तुफान मारा करून पोलिसांवर हल्ला करण्यात आला. यात परभणी ग्रामीण ठाण्याचे पोलिस निरीक्षक नरेंद्र पाडाळकर यांच्यासह फौजदार उदय सावंत, पोलिस कर्मचारी जनार्दन चाटे, राजकुमार बचाटे, ज्ञानेश्वर निंबाळकर, साईनाथ मिठेवाड, सुरेश सूरनर, योगेश सानप हे जबर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान पोलिसांच्या बंदुकीतून सुटलेली प्लास्टिकची गोळी पायाला लागून आर्वी येथील लखन इक्कर (22) हा जबर जखमी झाला आहे.