होमपेज › Marathwada › आंदोलनकर्ते निर्धारावर ठाम

आंदोलनकर्ते निर्धारावर ठाम

Published On: Jul 22 2018 1:01AM | Last Updated: Jul 21 2018 10:39PMबीड : पुढारी वृत्तसेवा

मराठा आरक्षणासाठी परळी येथे सुरू असलेल्या मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या ठिय्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जिल्हाभरातील कार्यकर्ते परळीकडे जाऊ लागले आहेत. दुसरीकडे शनिवारीही बीड, पाटोदा, वडवणी, गेवराई, ढेकणमोहासह इतर ठिकाणी आंदेलन करण्यात आले. गेवराई येथे मराठा तरुणांनी घोषणाबाजी करून निषेद नोंदविला. पाटोदा येथे मुंडण करून निषेध करण्यात आला, दरम्यान सायंकाळी परळीत आ. मेटे यांनी आंदोलकांची भेट घेतली.

वडवणीत कडकडीत बंद 

वडवणी : माजलगाव येथे रास्ता रोको दरम्यान मराठा बांधवांवर झालेल्या लाठी हल्याच्या निषेधार्थ शनिवारी वडवणीत कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी जय जिजाऊ, जय शिवराय या घोषणांनी वडवणी शदहर दुमदुमले होते. शनिवारी सकाळी वडवणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हजारोंच्या संख्येने मराठा तरुण जमले. शहरातील सर्वच व्यापार्‍यांनी बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत आपापले दुकाने उघडलेच नाहीत. सर्व मराठा व्यापारी सुद्धा बंदचे अवाहन करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. यावेळी घोषणाबाजी करीत मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, वसंतराव नाईक चौक मार्गे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली. यावेळी वडवणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीत अपंग मराठा तरुणांनी देखील चालत सहभाग घेतला होता.

स्वयंपाक, जेवणाच्या पंगती 

परळी : मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी परळी येथील उपविभागीय कार्यालयापुढे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या ठिय्या आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांसाठी येथेच स्वयंपाक आणि जेवणाच्या पंगती होत आहेत. येथे मोठ्या संख्येने जमलेल्या आंदोलकांसाठी फराळ, जेवण, पाणी याची सोय करण्यासाठी अनेकजण सरसावले आहेत. केळी, पाण्याचे पाऊचही अनेकांनी वाटप केले आहेत. आंदोलनातील कार्यकर्त्यांच्या जेवणासाठी याठिकाणी खुल्या मैदानावर आचारी लावून स्वयंपाकच सुरू केला. यामुळे आंदोलनात सहभागी झालेल्या शेकडो कार्यकर्त्यांची जेवणाची सोय झाली. विविध पक्ष, संघटनांनी पिण्याच्या पाण्याची व इतर अत्यावश्यक सोयी आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांसाठी पुरविल्या आहेत, दरम्यान कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घ्यावे म्हणून उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अधिकारी, वरिष्ठ पोलिस अधिकारी शासनाची भूमिका समजावून सांगत असले तरी आरक्षणाचा ठोस निर्णय झाल्याशिवाय माघार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.

पाटोद्यात तहसील कार्यालयासमोर ठिय्या

पाटोदा : परळीत सुरू झालेल्या मराठा ठोक मोर्चाचे पडसाद पाटोदा तालुक्यात देखील उमटत आहेत. शहरात तहसील कार्यालयासमोर समाज बांधव शुक्रवारपासून बेमुदत ठिय्या आंदोलनाला बसले आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाला सर्व पक्षांचा व समाजघटकांचा पाठिंबा मिळत असून शनिवारा आंदोलकांनी मुंडण करून शासनाचा निषेध केला. अनेक तरुण तहसील कार्यालयासमोर ठिय्या मांडून बसले असून जोपर्यंत आपल्या मागण्या शासन दरबारी मान्य होत नाही तो पर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा म्हणून पाटोदा शहरातील व्यापार्‍यांनी शनिवारी आपली दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली होती.