Tue, Jul 23, 2019 16:42होमपेज › Marathwada › कोपर्डी ‘ताई’च्या बहिणीच्या विवाहासाठी एकवटला सकल मराठा समाज

कोपर्डी ‘ताई’च्या बहिणीच्या विवाहासाठी एकवटला सकल मराठा समाज

Published On: Dec 09 2017 2:24PM | Last Updated: Dec 09 2017 2:24PM

बुकमार्क करा

बीड : उत्तम हजारे

राज्यभर गाजलेल्या कोपर्डी प्रकरणातील पीडित श्रद्धा (छकुली) हिची बहीण दीपाली हिच्या विवाहासाठी सकल मराठा समाज सरसावला आहे. दीपाली ही ११ डिसेंबर २०१७ रोजी वाकी (ता.बारामती) येथील प्रशांत जगताप पाटील यांच्याशी विवाहबद्ध होणार आहे. फलटण येथे होणार्‍या या विवाहसोहळ्यास राष्ट्रसंत भय्युजी महाराज, खा.उदयनराजे भोसले यांच्यासह  राज्यभरातून मराठी क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

नगर जिल्ह्यातील कोपर्डी (ता.कर्जत) येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला होता. कोपर्डीतील छकुलीवर अत्याचार करणार्‍या नराधमांना कठोर शिक्षा करण्यात यावी, या मागणीसाठी राज्यभरात मराठा समाजाचे क्रांती मोर्चे निघाले होते. महाराष्ट्राबाहेरही या प्रकरणाचे पडसाद उमटले होते. कोपर्डी प्रकरणातील तीन आरोपींना नगरच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

श्रद्धा बनली प्रेषक 

सुद्रीक पाटील-जगताप पाटील यांच्या या विवाह सोहळ्यास कोपर्डी घटनेची पार्श्‍वभूमी आहे. लग्नपत्रिकेवर श्रद्धाचे छायाचित्र छापण्यात आले आहे.  कै.श्रद्धा (छकुली) हिचे नाव प्रेषक म्हणून प्रकाशित करण्यात आले आहे. सकल मराठा समाजातील कोपर्डी येथील कार्यकर्त्यांवर व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. 

नारीशक्तीचा सन्मान

पत्रिकेच्या मध्यभागी एका महिलेचे छायाचित्र प्रकाशित करण्यात आले असून, नारी शक्तीचा सन्मान करण्यात आला आहे.