होमपेज › Marathwada › पशु चिकित्सालयातील सहायक आयुक्तांसह अनेक पदे रिक्त

पशु चिकित्सालयातील सहायक आयुक्तांसह अनेक पदे रिक्त

Published On: Jun 08 2018 1:23AM | Last Updated: Jun 08 2018 12:22AMपाथरी ः प्रतिनिधी

येथील तालुका लघु सर्व पशु चिकित्सालयातील सहायक आयुक्तांसह ग्रामीण भागात श्रेणी दोन पशुवैद्यकीय दवाखान्यातील अनेक पदे रिक्त आहेत. तसेच वाघाळा येथील पशु वैद्यकीय दवाखान्यातील पशुधन पर्यवेक्षक व परिचर ही दोन्ही पदे रिक्त आहेत. हा दवाखाना आठवड्यात दोन दिवस उघडला जात असल्याचे समजतेे. यामुळे तालुक्यातील 38 हजार पशुंच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

पाथरी येथे तालुका लघु सर्व पशु चिकित्सालय आहे. येथील पशुसंवर्धन सहायक आयुक्त यांचे पद अनेक दिवसांपासून रिक्त आहे. ग्रामीण भागात चार पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. यात वाघाळा, गुंज, हादगाव आणि रामपुरी येथील दवाखान्यात गैरसोय होत आहे. हादगाव आणि गुंज येथील परिचर तर वाघाळा येथील पशुधन पर्यवेक्षक व परिचर ही दोन्ही पदे रिक्त आहेत. यामुळे हा दवाखाना पाथरी येथील कार्यालयात असलेल्या पशुधन पर्यवेक्षक यांना पाठवून आठवड्यात दोनदा उघडला जातो. 

वाघाळा दवाखान्यांतर्गत वाघाळा, सारोळा, चाटेपिपळगाव, लिंबा, फुलारवाडी, मुदगल, विटा, आनंदनगर, विटा तारा ही दहा गावे येतात. आठवड्यात दोन दिवस दवाखाना उघडत असल्याने पशुपालकांची मोठी अडचण होत आहे. वाघाळा दवाखान्यांतर्गत गाय व म्हैस 5,840 व शेळ्या-मेढ्या 1,027 असे मिळून 6,867 एवढे पशुधन आहे. पावसाळ्यात पशुधनांना घटसर्प, फर्‍या यासारख्या विविध आजारांची लागण होते.त्यासाठी या कालावधीत पशुवैद्यकीय यंत्रणा सज्ज असणे आवश्यकआहे. मात्र पावसाळा तोंडावर आला आहे, पण तालुक्यातील पशुवैद्यकीय यंत्रणा कुचकामी असल्याचे दिसून येते.