होमपेज › Marathwada › बारा दिवसांपासून प्रेत झाडाला लटकतयं! 

बारा दिवसांपासून प्रेत झाडाला लटकतयं! 

Published On: Apr 19 2018 3:26PM | Last Updated: Apr 19 2018 3:26PMपरळी वैजनाथ (बीड) : प्रतिनिधी 

बोधेगाव येथील बारा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ माजली आहे.  आज (गुरुवारी)  सकाळी ११ च्या सुमारास त्याचा मृतदेह कावळ्याचीवाडी डोंगरावर एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. संबंधित इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कावळ्याचीवाडी गावापासून काही अंतरावर  डोंगररांगा आहेत.

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने या डोंगरपट्टयाच्या परिसरात सहसा कोणी फिरकत नाही. या ठिकाणी असलेल्या महादेव खोरी नावाने ओळख असलेल्या  शेतातील  एका लिंबाच्या झाडाला सुताच्या दोरीने गळफास घेतल्याची घटना समोर आली. गावातील काही महिला सरपण गोळा करण्यासाठी या ठिकाणी गेलेल्या असताना त्यांना ही घटना निदर्शनास आली. 

घटनेची माहिती मिळताच सिरसाळा पोलिस तातडीने घटनास्थळी  दाखल झाले. गेल्या बारा दिवसांपासून प्रेत झाडाला लटकलेलेच असल्याचे दिसून आले. त्यामुळे झाडावरून काढायला आवघड होउन बसले. मयत हा बोधेगाव येथील रहिवासी आहे. शेख हसन शेख चांद वय ५०  असे त्याचे नाव आहे. जागेवरच त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सिरसाळा पोलिस करीत आहेत.

Tags : Suicide, Crime Case, Beed