Wed, Jul 17, 2019 16:47होमपेज › Marathwada › आघाडीच्या उमेदवाराला विजयी करा

आघाडीच्या उमेदवाराला विजयी करा

Published On: May 17 2018 1:27AM | Last Updated: May 16 2018 10:22PMपरभणी : प्रतिनिधी

भाजप-शिवसेना युतीने देशातील जनतेची फसवणूक केली आहे. भाजपने लोकप्रियतेचा बुरखा पांघरूण जनतेची दिशाभूल करणे सुरू केले आहे. पैशाच्या जिवावर निवडणुका लढविल्या जात आहेत. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस विचारांवर सत्ताधार्‍यांना धारेवर धरून काम करीत असल्याने येत्या काळात राज्यातील सत्ता या आघाडीच्या हाती राहील तेव्हा विकासासाठी सर्वांनी परभणी हिंगोली-स्थानिक स्वराज्य संस्था मतदासंघातील विधान परिषदेच्या निवडणुकीत आघाडीचे उमेदवार सुरेश देशमुख यांना विजयी करा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले. दि. 16 मे रोजी सायंकाळी 6 वाजता राष्ट्रवादी भवन येथे माजी आ. सुरेश देशमुख यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना खा. चव्हाण बोलत होते. यावेळी मंचावर हिंगोलीचे खा. राजीव सातव, माजीमंत्री तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर, राजेश टोपे, आ. डी. पी. सावंत, महापौर मीनाताई वरपूडकर, माजी खा. तुकाराम रेंगे,  भाऊराव पाटील गोरेगावकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी, आ. विजय भांबळे, आ. डॉ.संतोष टारफे, आ. रामराव वडकुते,  दिलीप चव्हाण, राजेश विटेकर, जि.प.अध्यक्षा उज्वला राठोड, सय्यद समी, प्रताप देशमुख,भगवान वाघमारे, हेमंत आडळकर, जि.प.सदस्य भरत घनदाट, नदीम इनामदार, जयश्रीताई खोबे, भावना नखाते यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना खा.चव्हाण म्हणाले की, युती सरकारच्या काळात 13 हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. परंतु सरकारने त्या कमी होण्यासाठी काही केले नाही. बोंडअळी व दुष्काळाने शेतकरी कर्जबाजारी झाला. बेकारी वाढली, महागाईने देखील जनता हताश झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात असे झाले नाही परंतु आघाडी न झाल्याने सत्ता गेली. त्यामुळे येत्या काळात सर्वांनी एकत्रित येवून निवडणूका लढविल्यास राज्यात व देशात पुन्हा आघाडीचे सरकार येईल. यासाठी  विधान परिषदेच्या सभागृहातील संख्या वाढविण्यासाठी परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार सुरेश देशमुख यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहावे, असे ते म्हणाले. यावेळी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.