होमपेज › Marathwada › शंभर रुपयांत रानडुकरांना पळवा दूर

शंभर रुपयांत रानडुकरांना पळवा दूर

Published On: Aug 23 2018 1:28AM | Last Updated: Aug 23 2018 12:44AMशिरूर : जालिंदर नन्नवरे 

सध्या खरिपाचा हंगाम सुरू असून परिसरात जोमदार पिके पाहण्यास मिळत आहेत. या पिकांचे रानडुकरांकडून मोठे नुकसान होत आहे. पर्यायाने शेतकर्‍यांना काहीतरी देशी जुगाड करून या पासून शेती पिकांचे संरक्षण करावे लागत आहे. असाच अनोखा प्रयोग खालापुरी तील गोरख तांबे या शेतकर्‍याने केला असून तो प्रयोग परिसरातील शेतकर्‍यांना उपयोगी पडत आहे.

रानडुकराच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. याला प्रतिबंध करण्यात यावा अशी मागणी तालुक्यातील शेतकर्‍यांकडून वन विभागाकडे वारंवार केली जाते, परंतु यावर कसलाच मार्ग निघत नाही. आता शेतकरी आपल्या युक्तीचा वापर करून कमी खर्चामध्ये आपल्या शेतीपिकांना संरक्षण देताना दिसत आहेत. शिरूर तालुक्यातील खालापुरी येथील शेतकरी गोरख किसन तांबे यांनी पिकांचे रान डुकरांपासून संरक्षण करण्यासाठी केवळ शंभर रुपयांच्या खर्चात देशी जुगाड तयार केले आहे. याच्या माध्यमातून किमान एक एकर क्षेत्राला संरक्षण देण्यात ते यशस्वी ठरले आहेत. त्यांचा हा अनोखा प्रयोग पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी येथील शेतीला भेटी देऊन माहिती घेत आहेत.

असे तयार केले यंत्र

खराब झालेल्या कुलरचे पाते व सायकलच्या चाकाचा तीस रुपयाला मिळणारा भाग वापरून हवेवर फिरणारा पंखा तयार केला. याच्या खालच्या बाजूला मोठे ताट वापरून मोठा आवाज निर्माण होईल अशी याची रचना केली. जेव्हढी जोरात हवा येईल तेवढाच मोठा आवाज याच्या माध्यमातून तयार होत आहे. आवाजामुळे या परिसरात रानडुकर भटकत नाहीत. या साहित्यासाठी शंभर रुपये खर्च होतो.