Sun, Mar 24, 2019 06:15होमपेज › Marathwada › कोट्यवधींच्या थकबाकीचा वाढता डोंगर

कोट्यवधींच्या थकबाकीचा वाढता डोंगर

Published On: Mar 15 2018 1:19AM | Last Updated: Mar 14 2018 11:44PMपरभणी : नरहरी चौधरी

महावितरणने जिल्ह्यात शून्य थकबाकी वसुली मोहीम सुरू केली आहे, पण गत एक वर्षाचा आलेख पाहिला तर थकबाकीची रक्‍कम कमी होण्याऐवजी ती वाढतच गेली आहे. या रकमेने सध्या 225 कोटी रुपयांचा आकडा गाठला आहे. यात केवळ 12 कोटी 12 लाख 68 हजारांची वसुली फेबु्रवारी अखेरपर्यंत झाली आहे. यामुळे हा थकबाकीचा डोंगर कमी होण्याऐवजी वाढतच गेला असल्याचे वास्तव कायम आहे. थकबाकी वसुलीस महावितरण कंपनीच्या सर्वच अधिकारी व कर्मचार्‍यांना मोठे अपयश आल्याचे या वाढत्या थकबाकीवरून स्पष्ट होत आहे. 

प्रचंड थकबाकी, वीजगळती यामुळे महावितरणची अवस्था पोखरलेल्या डोंगरासारखी झाली आहे. राज्यात 38 हजार कोटींची थकबाकी झाली आहे. यात मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील थकबाकी ही बारा हजार कोटींची आहे. यात परभणी जिल्ह्याची थकबाकी जानेवारी अखेरपर्यंत 225 कोटी 20 लाख 60 हजारांवर पोहोचली आहे. यात घरगुती, व्यापारी, औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे.

थकबाकी वसुलीसाठी शून्य पद्धतीचा अवलंब हाती घेतला आहे. परभणी जिल्ह्यात 1 लाख 72 हजार घरगुती ग्राहक असून त्यांच्याकडे 197 कोटींची थकबाकी आहे. 12 हजार व्यापारी ग्राहक असून त्यांच्याकडे 11 कोटी तर 3 हजार औद्योगिक ग्राहक असून त्यांच्याकडे तब्बल साडेचार कोटींची थकबाकी आहे. या थकबाकी वसुलीसाठी महावितरणकडून मोठी जनजागृती करीत वीजपुरवठा खंडित करण्याचा धडाका सध्या मार्चअखेरच्या काळात सुरू करण्यात आला आहे. तब्बल 100 ते 150 अधिकारी व कर्मचार्‍यांचे पथक गावोगावी जाऊन ग्राहकांना वसुलीसाठी विनंती करीत आहेत.

यात अनेक गावांत ग्राहक व महावितरण कर्मचारी यांच्यात वाद होऊन प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले आहे, पण ऐन परीक्षेच्या काळात ही मोहीम महावितरणने हाती घेतल्यामुळे विद्यार्थ्यांचे मात्र शैक्षणिक नुकसान होणार हेही तेवढेच खरे समजावे लागेल. 

वसुलीसाठी वारंवार ग्राहकांना विनंती : थकबाकीदार ग्राहकांना वीजबिलाची वसुली देण्याकरिता महावितरणकडून मोठी जनजागृती करण्यात आली आहे. ज्या ग्राहकांनी विनंती करूनही वीजबिलाचा भरणा केला नाही अशा ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. गावोगावी दीडशे अधिकारी व कर्मचारी थकबाकीदारांकडून वसुली करीत आहेत.  - यशवंत कांबळे, अधीक्षक अभियंता,परभणी.