Thu, Apr 25, 2019 03:25होमपेज › Marathwada › आरक्षणावरुन व्यासपीठावरच जुगलबंदी

आरक्षणावरुन व्यासपीठावरच जुगलबंदी

Published On: Sep 01 2018 8:39PM | Last Updated: Sep 01 2018 8:49PMउस्मानाबाद : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्यस्तरीय मुस्लिम आरक्षण परिषदेच्या व्यासपीठावरच समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी आणि काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांची जुगलबंदी झाली. आजपर्यंत सत्तेत राहूनही काँग्रेस, राष्ट्रवादीने विशेष अधिवेशन घेऊन आरक्षण का दिले नाही, असा सवाल करीत समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीवर निशाणा साधला. यावर काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी मुस्लिम धर्मियांच्या आजपर्यंतच्या विकासात सर्वाधिक योगदान काँग्रेसचेच असल्याचा खुलासा करीत आझमी यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. 

महाराष्ट्र राज्यस्तरीय मुस्लिम आरक्षण परिषद आज शनिवार (दि. १ सष्टेंबर) छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहामध्ये झाली. अध्यक्षस्थानी खासदार हुसेन दलवाई होते. स्वागताध्यक्ष म्हणून आमदार राणा जगजितसिंह पाटील उपस्थित होते. आमदार अबूआझमी, नसीम खान, नवाब मलिक, बाबाजानी दुर्राणी, राहुल मोटे, काँग्रेसचे विश्वास शिंदे, तौफिक हत्तुरे, वजाहत मिर्झा, ख्वॉजा बेग आदी उपस्थित होते. राज्यभरातून मुस्लिम समाजातील आरक्षण समितीचे कार्यकर्ते, विचारवंत,सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. 

यावेळी या परिषदेत बोलताना लातूरचे मोहसीन खान यांनी कवितेतून ग्रामीण मुस्लिम समाजाची व्यथा मांडली. चंद्रपुर येथील फैजतुल्ला बेग यांनी मुस्लिम समाजाला आरक्षण मिळेपर्यंत कोणत्याही नेत्याने कोणत्याही कार्यक्रमात सत्कार, हार, फुल स्वीकारू नये. ही बाबलहान असली तरी याचा मोठा परिणाम होईल, असे मत व्यक्त केले. 

जमात ए इस्लामी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तौफिक अस्लम यांनी केवळ आरक्षणावरच न थांबता खासगी क्षेत्रात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी पुढाकारही नेत्यांनी घ्यावा तसेच सर्व मुस्लिम व्यवसाय करतात त्यांच्यात समन्वय तयार करून देशस्तरावर व्यवस्था निर्माण करण्याची मागणी केली. बीड चे प्रा. इलियास इनामदार यांनी राजकीय पक्षाला धर्म समजू नका. राजकीय नेते जसे सांगताततसे वागू नका, असा सल्ला दिला.

कोणावरही टिकाटिप्पणी न करता आता आरक्षणासाठी काय करता येईल, कोणता मार्ग अवलंबता येईल यावर चर्चा करावी, असे आवाहन केले. आ. मलिक यांनी चर्चेत हस्तक्षेप करुन केले. त्यांनी आंदोलन तेवत ठेवण्याचे आवाहन करत मुस्लिम समाजाला आरक्षणाला भाजपसरकारने वंचित ठेवल्याचा आरोप केला. नसिम खान यांनी २०१४ मध्ये आघाडी सरकारने मुस्लिम समाजाला आरक्षण दिले.मात्र, आरएसएसच्या इशाऱ्यावरून भाजपने मुस्लिम आरक्षणाचा कायदा केलानाही, असा आरोप केला.माजी आमदार युसुफ आब्रहानी, आमदार ख्वॉजा बेग, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनीही भाजपवर जोरदार टीका केली.

  • यावेळी हे ठराव मंजूर
  • समाजाला प्राथमिक ते उच्च शिक्षण मोफत देण्यात यावे.
  • मौलाना आझाद आर्थिक मंडळाला दरवर्षी २०० कोटी निधी द्या.
  • मुस्लिम मुले व मुलींसाठी शासकीय वसतिगृह सुरू करावे.
  • समाजाला सर्वच क्षेत्रात १० टक्के आरक्षण देण्यात यावे.
  • राज्यातील वक्फ जमिनीवरील अतिक्रमण हटवून विकास करा.