Fri, Apr 19, 2019 12:04होमपेज › Marathwada › सरकारला जबाब विचारण्यासाठी संघटन गरजेचे 

सरकारला जबाब विचारण्यासाठी संघटन गरजेचे 

Published On: Feb 05 2018 2:05AM | Last Updated: Feb 04 2018 10:55PMबोरी : प्रतिनिधी

गेल्या काही वर्षांपासून शेतकर्‍यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेेतकर्‍यांबाबत सरकार कोणतेच ठोस पाऊल उचलत नसल्यामुळे शेतकर्‍यांची मोठी फरपट होत आहे. अशा कठीण प्रसंगात शासनाला धडा शिकविण्यासाठी शेतकर्‍यांनी संघटीत होणे गरजेचे आहे, असे मत शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे संस्थापक खा. राजू शेट्टी यांनी व्यक्‍त केले.

रोहिला पिंप्री येथे खा. राजू शेट्टी यांच्या हस्ते नुतन शाखेचे उद्घाटन 4 फेब्रुवारी रोजी करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित शेतकर्‍यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रविकांत तुपकर होते. डॉ. प्रकाश फोपळे, रसिकाताई ढगे, माणिकराव कदम, शेख जफर, किशोर ढगे, केशव आव्हाड, तालुकाध्यक्ष इरशाद पाशा चाँद पाशा, मंचक सोळंके, माउली कदम आदी उपस्थित होते.

यावेळी खा. राजू शेट्टी म्हणाले की, शेतकर्‍याला वाली कोणी राहिला नसून, आपण सर्व संघटित राहिलो तर शेतमालाला योग्य हमीभाव मिळेल. यावेळी नूतन कार्यकारिणी तयार करण्यात आली. यात अध्यक्ष केशव पुंजारे, उपाध्यक्ष सुनील वसमतकर, युवाध्यक्ष अतिख पटेल, सल्लागार नवनाथ खोलसे, गजानन लवंडे, विश्‍वनाथ आंभोरे, प्रभू गिरी, निवृत्ती लहाडे, देशमुख आदींचा समावेश आहे.

वैजनाथ रसाळ यांच्या कार्यशैलीचा आदर्श घ्यावा

परभणी : प्रतिनिधी

चळवळीत काम करताना कार्यकर्त्यांनी ध्येयवादाला चिटकून न राहता शेती व परिवार सांभाळत चळवळ पुढे नेण्याचे काम करावे.  स्व.वैजनाथ रसाळ यांनी चळवळीत काम करताना ह्या दोन्ही बाजू सांभाळत परभणी जिल्ह्यात चळवळ वाढवत घराघरात नेली. त्यांच्या या कार्यशैलीचा वारसा नवीन पिढीतील कार्यकर्त्यांनी जोपासून शेतकरी चळवळ पुढे नेण्याचे काम करावे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खा.राजू शेट्टी यांनी केले.  

नांदापूर येथे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते तथा माजी जिल्हा संघटक दिवंगत वैजनाथराव रसाळ यांच्या मरणोत्तर कार्यगौरव कार्यक्रमप्रसंगी खा. शेट्टी बोलत होते. खा. शेट्टी म्हणाले की, पिढ्यानपिढ्या शेतकर्‍यांना लुटण्याच्या इतिहासाला बदलण्याचा प्रयत्न सर्वप्रथम महात्मा फुले यांनी केला. त्यानंतर शेतकरी संघटनेचे शरद जोशी यांनी ह्याच विषयावर देशात चळवळ रुजवली, तोच वारसा आज आम्ही चालवत असल्याचे त्यांनी सांगितले.