Wed, Apr 24, 2019 08:29होमपेज › Marathwada › खासदार सातव यांना ‘संसदरत्न’

खासदार सातव यांना ‘संसदरत्न’

Published On: May 31 2018 1:40AM | Last Updated: May 30 2018 10:21PMहिंगोली : प्रतिनिधी

सोळाव्या लोकसभेत आतापर्यंतच्या अधिवेशनात केलेल्या अष्टपैलू कामगिरीबद्दल हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांना सलग तिसर्‍यांदा 2018 या वर्षीचा संसद रत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 9 जून रोजी चेन्नई येथील आयआयटी येथे आयोजित सोहळ्यात पश्‍चिम बंगालचे माजी राज्यपाल तथा पंतप्रधानांचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम. के. नारायणन, माजी मुख्य निवडणूक आयुक्‍त टी. एस. कृष्णमूर्ती यांच्या हस्ते खासदार सातव यांना गौरविण्यात येणार आहे. 

चेन्नई येथील प्राईम पॉइंट फाउंडेशनतर्फे 2009 पासून दरवर्षी लोकसभेतील विविध कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. खासदाराची संसदेतील कामगिरी, त्यांचा विविध चर्चांमधील सहभाग, उपस्थित केलेल्या प्रश्‍नांची संख्या, खासगी सदस्य विधेयक संख्या, सभागृहातील उपस्थिती यासंदर्भात पीआरएस इंडियाने दिलेल्या आकडेवारीवरून कामगिरीचा आढावा घेऊन लोकसभा सचिवालयामार्फत पुरवलेल्या माहितीवरून मूल्यांकन निवड समितीमार्फत केले जाते. त्यानुसार मागील बजेट सत्रापर्यंतच्या अष्टपैलू कामगिरीच्या मूल्यांकनावरून खासदार सातव हे दुसर्‍या क्रमांकावर असून त्यांनी आतापर्यंत झालेल्या अधिवेशनात 171 वेळा चर्चेत सहभाग व तारांकीत, अतारांकीत 919 प्रश्‍न उपस्थित केले आहेत. 15 वेळा खाजगी सदस्य बिल मांडले. 

एकंदरीत कामगिरीचे मूल्यांकन केल्यावर 1105 अंक मिळवत ते दुसर्‍या क्रमांकावर पोचले आहेत, तर पहिल्या क्रमांकावर श्रीरंगअप्पा बारणे यांनी 1203 अंक मिळवले आहे. देशात सर्वाधिक प्रश्‍न विचारणार्‍या पहिल्या पाच खासदारांमध्येही खा. सातव यांचा समावेश आहे. या पुरस्काराचे वितरण आयआयटी चेन्नई येथे 9 जून रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी प्राइम पॉइंट फाउंडेशनचे संस्थापक के. श्रीनिवासन यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.