Thu, Jun 27, 2019 00:07होमपेज › Marathwada › सरकारमध्ये संवेदनशीलता उरली नाही : खा. अशोक चव्हाण

सरकारमध्ये संवेदनशीलता उरली नाही : खा. अशोक चव्हाण

Published On: Apr 10 2018 1:15AM | Last Updated: Apr 10 2018 12:47AMपरभणी : प्रतिनिधी

राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून केंद्र व राज्य सरकारला संवेदनशीलता राहिली नसून   हे सरकार 2019 च्या निवडणुकीसाठी थापा मारण्याचे काम करीत आहे, असा घणाघाती आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला.

शहरात 9 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसतर्फे उपवास आंदोलनादरम्यान मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस शहीद जवान शुभम मुस्तापुरे यास श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी मंचावर काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजीमंत्री सुरेश वरपुडकर, माजी खा.तुकाराम रेंगे, माजी जिल्हाध्यक्ष बालकिशन चांडक, महिला जिल्हाध्यक्ष जयश्रीताई खोबे, महापौर मीनाताई वरपुडकर, गटनेते भगवान वाघमारे, उपमहापौर सय्यद समी ऊर्फ माजु लाला आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात सुरेश वरपुडकर यांनी उपवास आंदोलन आयोजनाची पार्श्‍वभूमी सांगितली.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून केंद्र व राज्यातील सरकारच्या शेतकरी विरोधी, सर्वसामान्यांविरोधी, सुशिक्षित बेरोजगारांविरोधी धोरणांचा समाचार घेऊन येत्या काळात  काँग्रेस पक्षाचे सरकार सत्तेवर आणण्यासाठी परिश्रम घेणार असून भावी मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हेच होणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला. पुढे बोलताना खा.चव्हाण म्हणाले की, 2 कोटी सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देणार्‍या सरकारने प्रत्यक्षात मात्र 4 वर्षातही तो दिला नाही. गरीबांना शिक्षण देऊन त्यांना नोकरी मिळवून देण्याचे काम काँग्रेसने केले, परंतु भाजप सरकार पकोडे तळण्याचा सल्ला देऊन सुशिक्षित बेरोजगारांची थट्टा करीत आहे. शेतकर्‍यांचे हक्क डावलण्यात येत आहेत. येत्या काळात जनतेने काँग्रेसचा तिरंगा हातात घेऊन भाजपच्या नेत्यांना गावबंदी घालून महाराष्ट्र भाजपमुक्त करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. सूत्रसंचालन आतिक उर रहेमान यांनी केले. 

Tags : Marathwada, MP, Ashok Chavan, sensitivity, government