Mon, Jul 06, 2020 12:48होमपेज › Marathwada › मोरगावचे शेतकरी बनले बियाणे कंपनीचे मालक

मोरगावचे शेतकरी बनले बियाणे कंपनीचे मालक

Published On: Jun 07 2018 2:07AM | Last Updated: Jun 07 2018 1:05AMबीड : दिनेश गुळवे

बोगस बियाणांची भीती, बियाणांचे गगनाला भिडलेले भाव यांनी त्रस्त झालेल्या शेतकर्‍यांनी यातून स्वतःच मार्ग काढला. बीड तालुक्यातील मोरगाव येथील शेतकर्‍यांनी एकत्र येत बियाणे कंपनी तयार केली. यामुळे शेती कसणारा शेतकरी आता बियाणे निर्माताही झाला आहे. यास शासनाच्या आत्मा योजनेचे बळ मिळाले. 

 अनेकदा पेरलेले बियाणे बोगस निघाल्याचे उशिरा लक्षात येते, परंतु तोपर्यंत उशीर झालेला असतो. तर, कधी-कधी बियाणांचे दर प्रचंड असतात. या सर्व बाबीस कंटाळून बीड तालुक्यातील मोरगाव येथील शेतकर्‍यांनी एकत्र येत बियाणे कंपनी तयार केली. मोरगाव येथील अनिरुद्ध कागदे, योगेश यमपुरे यांच्यासह इतरांनी मिळून आत्मा योजनेतून बालाघाट अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनी तयार केले. सुरुवातीला बोटावर मोजण्याएवढ्या शेतकर्‍यांनी पुढाकार घेतला. आज मात्र या कंपनीचे 502 शेतकरी सभासद आहेत. 

या कंपनीतील अनिरुद्ध कागदे, योगेश यमपुरे यांनी परभणीच्या कृषी विद्यापीठ येथून सोयाबीन, बाजरी, मूग, उडीद व तुरीचे अत्याधुनिक मूलभूत बियाणे आणले. हे बियाणे शेतकरी सभासदांना देऊन त्यापासून नवीन बियाणे तयार केले. शेतकर्‍यांनी पिकविलेल्या सोयाबीन, मूग, उडीद, तूर यावर कंपनीमध्ये चाळणी, गाळणीसह इतर प्रोसेसिंग तयार करून कंपनीचा लोगोसह टॅगिंग केले जाते. या बियाणांची शासनाच्या प्रमाणीकरण यंत्रणेकडून गुणवत्ता तपासून बियाणे विक्री केले जाते. हे बियाणे माफक दरात मिळत असून उत्पादकताही चांगली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचा या बियाणांवरील विश्‍वास वाढत आहे.