Thu, Apr 18, 2019 16:35होमपेज › Marathwada › वॉटर कप स्पर्धेच्या श्रमदानात आमदारही

वॉटर कप स्पर्धेच्या श्रमदानात आमदारही

Published On: Apr 14 2018 1:42AM | Last Updated: Apr 14 2018 1:33AMआष्टी : प्रतिनिधी 

काम करीत असताना हा गरीब, हा श्रीमंत  हा भेदभाव घामांच्या धारांबरोबर गळून पडतो या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ओळींप्रमाणे आष्टी तालुक्यात सध्या सुरू असलेल्या वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. आमदार भीमराव धोंडे यांच्यासह ग्रामस्थांनी  शुक्रवारी श्रमदानात सहभाग घेतला.

तालुक्यातील करंजी गावाने तर या स्पर्धेत बाजी मारायचीच ही खुणगाठ बांधली आहे. या कामात आपलाही मोलाचा वाटा असावा आणि श्रमदानाच्या माध्यमातून जी चळवळ उभी राहत आहे त्याला हातभार लागावा या उद्देशाने आष्टी मतदारसंघाचे आ.भीमराव धोंडे यांनी  श्रमदानात आपला सहभाग नोंदवून हातात टिकाव, खोरे, घमेले घेत शुक्रवारी भल्यापहाटेच तालुक्यातील करंजी गावात सुरू असलेल्या पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत ग्रामस्थांसह श्रमदानात भाग घेतला.

विशेष म्हणजे तहसीलदार रामेश्वर गोरे, पोलिस उप विभागीय अधिकारी डॉ.अभिजित पाटील, गटविकास अधिकारी अप्पासाहेब सरगर कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य सोपान निंबोरे, उत्तम बोडखे, भारतीय जैन संघटनेचे शेखर मुथा, प्रीतम बोगावत, पारस मेहेर,यांनीही यात भाग घेऊन श्रमदान केले. आमदार, अधिकार्‍यांच्या श्रमदानातून नवचैतन्य निर्माण होत असल्याची भावना करंजी ग्रामस्थांनी बोलून दाखविली.

 

Tags ; beed, beed news, water cup competition, MLA,