Wed, Jul 24, 2019 02:11होमपेज › Marathwada › #Women’sDayआदर्श सून ते आमदार संगीता ठोंबरेंचा प्रवास

#Women’sDayआदर्श सून ते आमदार संगीता ठोंबरेंचा प्रवास

Published On: Mar 08 2018 2:06AM | Last Updated: Mar 08 2018 2:06AMकेज : दीपक नाईकवाडे

मुलाच्या लग्नानंतर घरात येणारी सून सासूच्या काळजीचा विषय बनते त्या मुळे सासू सुनेचा वाद ही घरोघरची नित्याची बाब झाली आहे, मात्र लग्नानंतर सासू सुनातील वादाला घरातून हद्दपार करत सासूसह कुटुंबातील सदस्यांच्या हृदयात आपले स्थान निर्माण करत आदर्श सून होण्याचा मान संगीता ठोंबरे यांनी मिळविला. तेवढेच नव्हे तर आदर्श सुनाची जिम्मेदारी पूर्ण करत केज मतदारसंघाच्या आमदारकी पर्यंत यशस्वी वाटचाल केली. केज मतदार संघाच्या विकासाला चालना देत मतदार संघात अनेक विकास कामे प्रभावीपणे त्या राबवत आहेत. 

सासू-सुनाची शाब्दिक चकमक नसणारी घरे समाजात फारच कमी आहेत. अशाच घरा पैकी डॉ. विजयप्रकाश ठोंबरे यांचे घर आहे. लग्नानंतर घरी सून म्हणून आलेल्या संगीता ठोंबरे यांनी आपल्या प्रेमळ व स्मित हास्याने आपले घर व कुटुंब सदोदित हासत खेळत ठेवत घरातून सासू-सुनाची चकमक हद्दपार केली.  सासुबाईसह आज्जसासू असलेल्या मथुराबाई अंहकारे यांच्यासह संपूर्ण कुटुंबातील सदस्यांची सेवा व काळजी घेत घरकाम करत त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर प्राध्यापक म्हणून काम करत असताना कधीही सासू-सुनातील नात्यातील प्रेम कधी कमी होऊ दिले नाही.

पती डॉ. विजयप्रकाश ठोंबरे हे कृषी विद्यापीठात संशोधक असल्याने पती सोबत सोलापूर, पुणे आदी बदलीच्या ठिकाणी वास्तव्यास असतानाही संगीताताई ठोंबरे कुटुंबातील सदस्याची सेवा करत होत्या. सून ते प्राध्यापिका हा प्रवास करत असताना त्यांनी राजकारणात प्रवेश करून केज मतदार संघाच्या आमदारपदा पर्यंत यशस्वी वाटचाल केली. आमदार झाल्यानंतर ही त्यांनी आई, सून व पत्नीचे कर्तव्य चोखपणे बजावले आहे. 

गृह प्रवेश केल्यानंतर संगीता ठोंबरे यांनी सासू व आज्जेसासू सोबत सुनाचे नव्हे तर मुलीचे नाते जोडल्याने सासू-सुनातील मैत्री घट्ट झाली. त्यामुळे पतीच्या बदलीच्या ठिकाणी त्यांनी  आज्जेसासू व आज्जेसासरे यांना घेऊन आपल्या सोबतच ठेवले होते. त्यांची सेवा करण्यातील आनंद शब्दात व्यक्त करता येणार नसल्याचे संगीता ठोंबरे यांनी सांगितले. त्यांच्या आज्जेसासू मथुराबाई यांनी अखेरचा श्‍वास ही संगीता ठोंबरे यांच्या घरीच घेतल्याने आदर्श सून ते आमदार पदापर्यंत यशस्वी वाटचाल करणार्‍या आ. संगीता ठोंबरे यांची कुटुंबवत्सलता दिसून आली.