Sun, Jun 16, 2019 12:33
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › पावसाच्या दडीने पेरणीला खो

पावसाच्या दडीने पेरणीला खो

Published On: Jun 22 2018 2:08AM | Last Updated: Jun 21 2018 11:04PMबीड : प्रतिनिधी

खरीप हंगाम सुरू होऊन पंधरवडा उलटला, तरीही पावसाअभावी पेरणीला खो बसला आहे. शेतकर्‍यांनी बी-बियाणे खरेदी केले असले, तरी पुरेशा पावसाअभावी शेतकरी पेरणी टाळत आहेत. गतवर्षी याचदरम्यान तीन लाख हेक्टर पेरणी झाली होती. यंदा मात्र दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी शेतकरी चांगल्या पावसाची वाट पहात आहेत. पाठीमागील दोन वर्षापासून सतत शेतकर्‍यांना दुबार पेरणीस सामोरे जावे लागले होते. त्यामुळे शेतकर्‍यांचे तोंड दुधाने पोळाल्याने आता ताकही फुंकून पिले जाऊ लागले आहेत. यावर्षीही हवामान खाते व कृषी विभागाने शेतकर्‍यांना चांगल्या पावसानंतर पेरणी करण्याचे आवाहन केले होते. तसेच 10 जून ते 22 जूनदरम्यान चांगला पाऊस नसल्याचे भाकित करण्यात आले होते. या दरम्यानच 18 जूनपर्यंत पावसानचे दडी मारल्याने शेतकरीही हवालदिल झाले होते. त्यामुळे शेतकर्‍यांनी पेरणी टाळली आहे. 

मृग नक्षत्रामध्ये म्हणा किंवा 7 जून ते 20 जून पर्यंत म्हणा पेरणी केल्यास चांगले उत्पादन होते शिवाय पिकांवर रोगराई येत नाही, अशी शेतकर्‍यांची धारणा आहे. त्यामुळे याच कालावधीत शेतकर्‍यांचा पेरणीसाठी कल असतो. यावर्षी मात्र समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकर्‍यांनी पेरणीसाठी हात आखडला आहे. 

लाल्याचा मारा, तरीही कापूसच बरा

जिल्ह्यात दरवर्षी कापसाची लागवड तीन लाख हेक्टरवर होते. गेल्या काही वर्षांत कापसावर सातत्याने लाल्या रोग व बोंडअळीचा हल्ला होत आहे. तसेच कापूस वेचणीसही मोठा खर्च होत आहे. असे असले तरी शेतकर्‍यांकडून कापसाचीच लागवड मोठ्या प्रमाणावर होत आहे. यंदाही आतापर्यंत सर्वाधिक पेरा कापसाचाच आहे. 

जेथे पाऊस, तेथेच गर्दी

ज्या भागात पाऊस पडेल, त्याच भागातील खत आणि बियाण्याच्या दुकानावर गर्दी होताना दिसत आहे. एरव्ही सगळीकडेच्या मोंढ्यांमध्ये गर्दी दिसायची. यावर्षी मात्र चित्र वेगळे दिसत आहे.