होमपेज › Marathwada › सेनगाव पंचायत समितीला ठोकले कुलूप

सेनगाव पंचायत समितीला ठोकले कुलूप

Published On: Mar 15 2018 1:19AM | Last Updated: Mar 14 2018 11:39PMसेनगाव : प्रतिनिधी

सेनगाव पंचायत समितीत कर्मचारी अनुपस्थित राहत आहेत. त्यातच पं. स. सदस्यांच्या मासिक बैठकीला गटविकास अधिकारी गैरहजर राहत असल्याच्या कारणावरून समिती सभापतीनीच चक्‍क पंचायत समितीला मंगळवारी दि. 13 मार्च रोजी कुलूप ठोकल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. कुलूप ठोकून सर्व पदाधिकार्‍यांनी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे याबाबत तक्रारी मांडल्या.

सेनगाव तालुक्यात 130 गावे असून 107 ग्रामपंचायतीमार्फत पंचायत समितीअंतर्गत कामे पाहिली जातात. पंचायम समितीला मागील काही महिन्यांपासून प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून बी. डी. पंडित कार्यरत आहेत. दरम्यान, मंगळवारी दि. 13 मार्च रोजी समितीच्या सदस्यांची मासिक बैठक बोलावण्यात आली होती. सभापती, उपसभापती व सदस्य कार्यालयात बैठकीसाठी दुपारी दाखल झाले. मात्र योवळी बैठक घेण्यासाठी गटविकास अधिकारी हजर नव्हते. या प्रकारामुळे पदाधिकार्‍यांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली.

दरम्यान, येथील समितीमध्ये कर्मचारी व अधिकारी विविध कारणे पुढे करीत सतत अनुपस्थित राहत आहेत. त्यामुळे विविध कामांसाठी ग्रामीण भागातून येणार्‍या लाभार्थ्यांची मोठी गैरसोय वाढली आहे. शिवाय मागील महिन्यात आयोजित सदस्याच्या मासिक बैठकीला ही गटविकास अधिकारी उशिरा आले होते.या सर्व कारणांवरून सभापती स्वाती पोहकर, उपसभापती ममता वडकुते, पं. स. सदस्य संतोष खोडके, संतोष खंदारे, सुनील मुंदडा, अ‍ॅड. केशव भालेराव, अशोक कावरखे, अनिता मानवतकर, रायाजी चोपडे आदींनी आक्रमक भूमिका घेत सर्व कर्मचार्‍यांना कार्यालयातून बाहेर निघण्याच्या सूचना दिल्या. सर्व विभागांतील कर्मचारी अधिकारी दुपारी एक वाजता पटापट बाहेर निघाले.

सर्व पदाधिकार्‍यांनी समितीच्या कार्यालयाच्या मुख्यद्वाराला कुलूप ठोकून थेट जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांच्या कक्षात पोहोचले. संतप्‍त पदाधिकार्‍यांनी याबाबत तक्रारी मांडल्या बर्‍याच वेळ चर्चा झाली. येत्या 21 मार्च रोजी स्वत: जि. प. सीईओ डॉ. तुम्मोड, उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍याची सेनगाव पंचायत समितीमध्ये मासिक बैठकीला उपस्थित राहण्याचे आश्‍वासन मिळाल्यानंतर आक्रमक पदाधिकारी शांत झाले. दरम्यान, पं. स. ला खुद सभापती, उपसभापती व सदस्यांनी कुलूप ठोकल्याच्या प्रकारामुळे समिती आवारात एकच खळबळ उडाली होती. काही वेळातच गटविकास अधिकारी पंडित समितीत दाखल झाले होते.