Mon, Apr 22, 2019 15:55होमपेज › Marathwada › स्कूल चलें हम...

स्कूल चलें हम...

Published On: Jun 15 2018 1:05AM | Last Updated: Jun 14 2018 10:20PMबीड : प्रतिनिधी

उन्हाळ्याच्या सुटीनंतर  शुक्रवारी (दि.15) पुन्हा शाळा सुरू होत आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात येणार आहे. यासह सर्व मुलांना पुस्तकेही दिली जाणार आहेत. शाळेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांनीही दप्तर, बूट, वॉटरबॅग आदींची खरेदी केली असून, मुले आजपासून स्कूल चलें हम... म्हणण्यास सज्ज झाली आहेत.

एप्रिल-मे पासून विद्यार्थ्यांना सुट्या सुरू झाल्या आहेत. बीड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या अडीच हजार शाळा आहेत. त्यामध्ये तीन लाख 80 हजारांवर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.  शुक्रवार पासून शाळा सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांनीही तयारी केली आहे. यासाठी दप्तर, बूट, वॉटरबॅग आदींची खरेदी केली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व शिक्षक विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करणार आहेत. शिक्षकांनी गुरुवारीच शाळेवर जाऊन शाळा स्वच्छ केली आहे. शुक्रवारी पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना 19 लाख पाठ्यक्रमाची पुस्तके दिली जाणार आहेत.  

सुस्वागतम्ने सजले शाळांचे फलक
शुक्रवारी पहिल्याच दिवशी शाळेमध्ये प्रवेशोत्सव साजरा केला जाणार आहे. शाळेमध्ये प्रसन्न वातावरण रहावे, यासाठी गेवराई तालुक्यातील तरटेवाडी, साठेवाडी, पोखरी, पाचेगाव तांडा यासह इतर काही शाळेमध्ये फलक सजविले असून, त्यावर सुस्वागतचे नक्षीकाम केले आहे.शुक्रवारी शाळांमध्ये मिरवणूक, रांगोळी, सजावट आदी कामे केली जाणार आहेत. 

उर्दू माध्यमाच्या शाळा 18 पासून

सध्या रमजान महिना सुरू आहे. त्यामुळे उर्दू माध्यमांच्या शाळा सुरू होण्यास तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे उर्दू माध्यमांच्या शाळा 18 जूनपासून सुरू करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. 

मिरवणुका ठरणार लक्षवेधी

शुक्रवार (दि.15)  पासून शाळा सुरू होणार असून, या पार्श्‍वभूमीवर नव्याने शाळेत दाखल होणार्‍या विद्यार्थ्यांची मिरवणूक काढली जाणार आहे. जिल्हाभरातील विविध शाळांमधून निघणार्‍या या मिरवणुका लक्षवेधी ठरणार आहेत. गतवर्षी काही शाळांनी चक्क रथ, घोड्यावरून मिरवणूक काढली होती, तसेच विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना शाळा प्रवेशाच्या शुभेच्छाही दिल्या होत्या.