Tue, Jul 23, 2019 10:28होमपेज › Marathwada › शाळांमध्ये उघड्यावर विद्यार्थ्यांना धडे

शाळांमध्ये उघड्यावर विद्यार्थ्यांना धडे

Published On: Jul 13 2018 12:49AM | Last Updated: Jul 12 2018 10:18PMमाजलगाव : सुभाष नाकलगावकर

तालुक्यातील अनेक शाळांची अतिशय दुरवस्था आहे. स्कूल चले हम... चा नारा देत विद्यार्थ्यांना शाळेविषयी गोडी लावण्याचे काम सुरू असले तरी दुसरीकडे मात्र ज्ञानार्जनाचे काम अतिशय हलाकीच्या परिस्थितीत सुरू आहे. गंभीर बाब म्हणजे तालुक्यातील काही शाळांना इमारतच नसल्याने त्या शाळेतील विद्यार्थ्यांची शाळा झाडाखाली भरविली जात आहे. तेथे विद्यार्थ्यांना पाऊस, ऊन व वारा यांचा सामना करीत ज्ञानार्जन करावे लागत आहे.

शासनाने 14 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी शिक्षण हे सक्तीचे व मोफत केले आहे. त्यासाठी कायदाही तयार करण्यात आला आहे. यामुळे अधिकाधिक मुलांना शाळेत यावे, ज्ञानाचे धडे गिरवावेत यासाठी शासन व लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने प्रयत्न सुरू असतात. एकीकडे विद्यार्थ्यांना शाळेत यावे यासाठी पहिल्याच दिवशी बैलगाडीतून मिरवणूक काढणे, फूल देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करणे, शाळेत रांगोळी काढून व भिंती रंगवून शाळा सजविणे असे प्रयोग केले जात असले तरी दुसरीकडे मात्र ज्या शाळांना इमारत नाही, त्यांचे काय? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. तालुक्यातील तब्बल 14 शाळा अशा विना इमारतीच्या आहेत. 

शाळांना इमारत नसल्याने या शाळा मंदिर, ग्रामपंचायत, चावडी अशा सार्वजनिक ठिकाणी भरतात. तर, काही शाळा चक्क झाडाखाली उघड्यावरच भरतात. शिक्षण मंत्री विनोद तावडे हे अत्यंत कार्यकुशल पद्धतीने आपला विभाग सांभाळत असताना त्यांच्या अखत्यारितीतील जिल्हा परिषदेच्या शाळा या मिळेल त्या जागेवर शालेय शिक्षण देत आहेत. माजलगाव तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 219 प्राथमिक शाळा आहेत. बहुतांश शाळेत अनेक बिकट समस्या देखील आहेत, परंतु आहे त्यात गोड समजून या शाळा भरवल्या जातात. इतर शाळेमध्ये डिजिटल क्‍लासरूम, संगणक, प्रोजेक्टरद्वारे अद्ययावत शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. तर काही शाळांना बसण्यासाठी जागाच नसल्याने त्यांच्या भवितव्यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. या 14 शाळा द्विशिक्षकी आहेत. यातील अनेक शाळांमध्ये चांगली पटसंख्या आहे. असे असतानाही अधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत आहे. अशा शाळेत शिक्षण घेणे विद्यार्थ्यांसाठी धोक्याचे आहे, शिक्षकांसाठीही ते योग्य नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य व अभ्यास याचा विचार करून जिल्हा परिषदेने या 14 शाळांना इमारत बांधून देण्याची मागणी पालकांसह शिक्षणप्रेमीतून मोठ्या प्रमाणावर होत आहे.