होमपेज › Marathwada › एक हजार केंद्रांवर निरक्षरांना धडे

एक हजार केंद्रांवर निरक्षरांना धडे

Published On: May 18 2018 1:18AM | Last Updated: May 18 2018 12:30AMबीड : दिनेश गुळवे

गेल्या काही वर्षांपूर्वी शिक्षण क्षेत्रातील सावळा गोंधळ पटपडताळणीने समोर आणला असला, तरी अजुनही काही बाबतीत शिक्षणक्षेत्रात असे आश्‍चर्यकारक कामे निरंतर होत आहेत. आजघडीला जिल्ह्यातील एक हजार केंद्रावर निरक्षर ज्येष्ठ नागरिकांना क, ख, ग चे धडे गिरविण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे हे वर्ग गावोगाव दररोज एक तास चालतात, असे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. यातून सरासरी वर्षाला वीस हजार निरक्षर अक्षर ओळख करून घेतात. साक्षरतेमध्ये वाढ व्हावे, शिकवून-सवरून लोक शहाणे व्हावीत, नागरिकांमध्ये सजगता वाढावी आदींसाठी शिक्षणप्रसाराचे काम कित्येक वर्षांपासून सुरू आहे. 

लहान मुलांना जसे प्राथमिक शिक्षण सक्तीने व मोफत दिले जात आहे, त्याच प्रमाणे निरक्षर तरुण व ज्येष्ठ नागरिकांनाही अक्षर ओळख करून देण्याचे काम सुरू आहे. यासाठी साक्षर भारत योजनेंतर्गत बीड जिल्ह्यात एक हजार 19 केंद्र (प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक) सुरू आहेत. 

या एका केंद्रावर दोन प्रेरक याप्रमाणे जिल्ह्यात दोन हजार 38 प्रेरक निरक्षरांना अक्षर ओळख, अंकमोड करण्याचे काम करतात. या केंद्रावर निरक्षरांना दररोज एक तास असे धडे दिले जातात. हे केंद्र दररोज सुरू असल्याचेही अधिकार्‍यांचे म्हणणे आहेत. या योजनेमध्ये वर्षाकाठी सरासरी 20 हजार नागरिकांना शिकविण्याचे काम केले जात आहे. यासाठी निरंतर केंद्रांना फळा, खडू व शिक्षण घेणार्‍यांना पुस्तकही दिले जात आहे. 

अशा केंद्रावर शिक्षण घेण्यासाठी वर्षांतून दोन बॅच घेता येतात. दर सहा-सहा महिने एका बॅचला शिकविले जाते. यानंतर राष्ट्रीय मुक्त शाळा (एनआयओएस) यांच्याकडून परीक्षा घेतली जाते. 150 गुणांच्या या परीक्षेत पात्र ठरलेल्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेता येतो. अशा या निरंतर शिक्षणातून वर्षाकाठी सरासरी वीस हजार ग्रामस्थांना अक्षर ओळख करून देण्याचे काम सातत्याने सुरू आहे.