Thu, Mar 21, 2019 11:32होमपेज › Marathwada › जिल्ह्यातील जलशयांमध्ये पाणीसाठा आला निम्म्यावर

जिल्ह्यातील जलशयांमध्ये पाणीसाठा आला निम्म्यावर

Published On: Mar 05 2018 1:43AM | Last Updated: Mar 05 2018 1:28AMबीड : प्रतिनिधी

मागच्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्प तुडूंब भरले होते, मात्र पाणी उपसा, बाष्पीभवन व इतर कारणांमुळे आता पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. जिल्ह्यातील प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा निम्म्यावर म्हणजेच 52 टक्कयांवर आला असून 19 प्रकल्पातील पाणी हे प्रकल्पाच्या जोत्याखाली गेले आहे. उन्हाळा संपेपर्यंत ही प्रकल्प अटतील असे चित्र निर्माण झाले आहे.

जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता 1137 दलघमी इतकी आहे. या तुलनेत आजघडीला या प्रकल्पांमध्ये एकूण 708.212 दलघमी इतका पाणीसाठा शिल्लक असून यापैकीही 464.388 दलघमी इतकेच पाणी वापरण्यायोग्य म्हणजेच उपयुक्त पाणीसाठा शेष राहिला आहे. जिल्ह्यात माजलगाव व मांजरा हे दोन मोठे प्रकल्प तर बिंदुसरा, सिंदफणा, बेलपारा, महासांगवी, मेहेकरी, कडा, कडी, रूटी, तलवार, कांबळी, वाण, बोरणा, बोधेगाव, सरस्वती, कुंडलिका, वाघेबाभुळगाव असे 16 मध्यम प्रकल्प आहेत.

याशिवाय 126 लघु प्रकल्प आहेत. गतवर्षी जिल्ह्याने पावसाची 666 मिमीची वार्षिक सरासरी ओलांडली. दरम्यान, माजलगाव या मोठ्या धरणात आजघडीला 51.79 टक्के तर मांजरा या अन्य मोठ्या प्रकल्पात अद्यापही 73.79 टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. 16 मध्यम प्रकल्पात मिळून एकत्रितरित्या 109 दलघमी तर 126 लघु प्रकल्पात मिळून एकत्रितरित्या अवघा 117 दलघमी इतकाच उपयुक्त पाणीसाठा उरला आहे.

आगामी काळात उन्हाचा पारा वाढत जाणार असल्याने बाष्पीभवन प्रक्रियाही वेगाने होणार आहे. त्यातच सिंचनासाठी पाण्याचा उपसा सुरूच असल्याने प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने कमी होणार असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात 105 टक्के इतका पाऊस झाला होता. त्यामुळे पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात जिल्ह्यातील सर्वच तलाव, धरणे तुडुंब भरले, मात्र यानंतर अवघ्या तीन ते साडेतीन महिन्यांतच पाण्याचा सिंचनासाठी मोठ्या प्रमाणावर उपसा झाल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा अर्ध्यावर आला आहे. 

एकाही प्रकल्प शंभर टक्के नाही

उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच प्रकल्प आटू लागल्याचे चित्र आहे. सध्या एकाही प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा उरलेला नाही. 39 प्रकल्पांतील पाणीसाठा हा 25 ते 50 टक्कयांदरम्यान आहे. 46 प्रकल्पातील पाणी हे 25 टक्कयांपेक्षाही कमी झाले आहे. तर 19 प्रकल्पातील पाणीसाठा तर प्रकल्पाच्या जोत्याखाली गेला आहे. मार्चच्या प्रारंभीच एक प्रकल्प कोरडाठाक पडला आहे.  गत महिन्याच्या प्रारंभी 144 प्रकल्पांपैकी केवळ 28 प्रल्पल्पांमध्येच 75 टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा शिल्लक होता, मात्र आजघडीला केवळ 3 प्रकल्पातील पाणीसाठा हा 75 टक्कयांपेक्षा अधिक असून महिनाभरात 25 प्रकल्पातील पाणीसाठा हा 50 टक्कयांपेक्षा अधिक घटला आहे. याशिवाय 36 प्रकल्पांमध्ये 50 ते 75 टक्कयांदरम्यान पाणीसाठा आहे.