Wed, Jul 17, 2019 18:19होमपेज › Marathwada › बिबट्याचे भय संपता संपेना!

बिबट्याचे भय संपता संपेना!

Published On: Mar 10 2018 2:08AM | Last Updated: Mar 10 2018 1:12AMलिमला : प्रतिनिधी

मागील पाच दिवसांपासून धुमाकूळ घालणार्‍या बिबट्याच्या तावडीत सापडलेल्या शेतकर्‍यांच्या दोन जनावरांचा जीव गेला. शेतकरी पोटच्या लेकरांप्रमाणे आपल्या जनावरांची काळजी घेतो, मात्र बिबट्याने लहान वासरांना भक्ष केल्याने शेतकर्‍यांच्या गोठ्यातील जनावरे दिवसेंदिवस असुरक्षित असल्याचे अनुभव  गोदापट्ट्यातील शेतकरी अनुभवू लागले आहेत.  वनविभागाकडून केवळ कार्यवाहीची औपचारिकता पूर्ण केल्या जात आहे. प्रत्यक्षात मात्र उपाययोजना करण्यात वनविभागाला अपयश येत आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या मनातील भय संपत नसल्याने स्वतः रात्रंदिवस पहारा लावून शेतीची कामे करण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. 

पूर्णा तालुक्यातील देवठाणा येथील शेतकरी पिराजी जोगदंड यांच्या आखाड्यावरील बांधलेल्या वासराचा 5 मार्च रोजी रात्री फडशा पाडला. 6 मार्चच्या रात्री गोदावरी विद्यालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या बळीराम दुधाटे या देऊळगाव येथील शेतकर्‍यांच्या वासराचा जीव बिबट्याने घेतला. 7 मार्च रोजी पाहणीसाठी आलेल्या वन विभागाच्या कर्मचार्‍यांसमोर  बिबट्या पसार झाला.देऊळगाव पासून एक कि.मी. अंतरावर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा असून देवठाणा व देऊळगाव येथील विद्यार्थी पायी शाळेत येत असतात. त्यामुळे दुसर्‍या वासराचा पाडलेल्या फडशामुळे शेतकर्‍यांसह शालेय विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण झाली. वन विभाग  कर्मचार्‍यांनी पिंजरा बसवून बिबट्याला पकडण्यासाठी नियोजन केले आहे, परंतु बिबट्या मात्र पिंजर्‍यात न जाता आज इथे तर उद्या तिथे दर्शन देत असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले. गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या गर्द झाडीत बिबड्या दिवसा वास्तव्य करीत आहे.

 सायंकाळी व सकाळी शेतकर्‍यांच्या जनावरांवर हल्ला करणारा बिबट्या वन विभागाच्या कर्मचार्‍यांना वारंवार हुलकावणी देऊन पसार होण्यात यशस्वी होत आहे. सद्यःस्थितीला सुगीचेे दिवस असून शेतकरी सकाळच्या वेळेत कामे करण्यासाठी शेतात येतात. मात्र बिबट्याच्या भीतीने सर्व कामे सोडून बिबट्याच्या बंदोबस्ताची वाट पाहत बसला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षांना सुरुवात झाली असून यातच बिबट्याची निर्माण झालेली भीती विद्यार्थ्यांच्या मनातून जात नाही. यासाठी वन विभागाने बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी गोदापट्ट्यातील वझुर, देवठाणा, लिमला, देऊळगाव, मुंबर, गोळेगाव, धानोरा येथील गावकर्‍यांकडून करण्यात येत आहे. पाच दिवस होऊनही बिबट्याचा थांगपत्ता वनविभागाला लागत नसल्याने प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याचा आरोपही परिसरातील शेतकरी करीत आहेत.