Mon, Apr 22, 2019 11:44होमपेज › Marathwada › ‘बिबट्या दर्शनाने’ दौंडवाडी, भोजनकवाडी परिसरात जागर

‘बिबट्या दर्शनाने’ दौंडवाडी, भोजनकवाडी परिसरात जागर

Published On: Jun 21 2018 1:24AM | Last Updated: Jun 20 2018 10:52PMपरळी : प्रतिनिधी

धर्मापुरी परिसरातील भोजनकवाडी - दौंडवाडी शिवारातील बिबट्या दर्शनाने भोजनकवाडी - दौंडवाडी परिसरात नागरिकांचा जागर सुरू झाला आहे. भोजनकवाडीनंतर बुधवारी दुपारी 11.30 च्या दरम्यान दौंडवाडी शिवारात एका शेतकर्‍याला बिबट्या दिसल्याची चर्चा आहे. या ठिकाणी बिबट्याचा वावर असल्याचे यापूर्वीच वनविभागाच्या पाहाणीत आढळून आलेले आहे. पुन्हा एकदा ‘बिबट्या दर्शन’ झाल्याने वनविभागाचे पथक  परिसरात तळ ठोकून आहे.

परळी तालुक्यातील धर्मापुरी जवळच्या  भोजनकवाडी शिवारात बिबट्याचा वावर असल्याचे  काही दिवसांपूर्वी स्पष्ट झाले. त्याने शेतात काम करणार्‍या अंकुश वसंत केदार  यांच्यावर हल्ला केल्याने ते किरकोळ  जखमी झालेले आहे. वनविभागाच्या वतीने याची शहानिशा करण्यात आली. या ठिकाणी बिबट्याचा वावर झाल्याच्या खुणा आढळून आल्या असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. भोजनकवाडी गावाच्या आसपास डोंगरजमीन आहे. तसेच परिसरात दौंडवाडी शिवारातील डोंगर परिक्षेत्र व काही प्रमाणात झुडपी वनक्षेत्र आहे. 

पेरणीच्या दिवसांत कामे ठप्प

शिवारात बिबट्या असल्याची  चर्चा गावात व परिसरात पसरली. यामुळे नागरिकांत भीती निर्माण झाली. शिवारात बिबट्या फिरत  असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या घटनेमुळे भोजनकवाडी - दौंडवाडी परिसरात नागरिक दिवसरात्र दहशतीखाली आहेत. शेतात जायला भीती वाटत असल्याचे नागरिक सांगत आहेत. तसेच सध्या पेरणीचे दिवस असून ही कामे ठप्प झाली आहेत. 

शोधकार्य सुरू 

वनविभागाचे पथक या परिसरात तळ ठोकून आहे. गावकर्‍यांनी याबाबत स्वतःहून शोध घेत फिरण्याची आवश्यकता नाही. वनविभागाच्या वतीने सर्वतोपरी शोध घेण्यात येत आहे.   दौंडवाडी तसेच भोजनकवाडी येथील ज्या शेतकर्‍यांनी बिबट्या दिसल्याचा दावा केला त्यांच्याकडून माहिती घेऊन जबाब नोंदवण्यात आल्याचे वनविभागाने सांगितले.