Wed, Mar 20, 2019 23:19होमपेज › Marathwada › धसांची सोयरीक, धोंडेंची धडधड

धसांची सोयरीक, धोंडेंची धडधड

Published On: Jun 24 2018 1:33AM | Last Updated: Jun 23 2018 10:07PMबीड : सुशील कुलकर्णी

विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत सुरेश धस यांचा विजय बीडचे राजकारण बदलणारा ठरेल असे भाकीत वर्तवले जात असतनाच आणखी एक गोष्ट त्यांच्या खासगी जीवनात महत्त्वाची घडत आहे, ती म्हणजे सुरेश धस यांचे चिरंजीव जयदत्त धस यांचा विवाह साहेबराव दरेकर या माजी आमदारांच्या नातीशी नक्की झाला आहे. आष्टी पाटोदा आणि शिरूरकासार याच्या राजकारणाला नवी कलाटणी देणारा हा विषय आहेच, पण सुरेश धस यांची विधान परिषदेवर निवड झाल्यावर सुटकेचा श्वास सोडणार्‍या भीमराव धोंडे यांच्यासाठी चिंतेत वाढ करणारा आहे.

भीमराव धोंडे आणि सुरेश धस यांचे राजकारणच परस्परांच्या विरोधावर आधारलेले आहे. साहेबराव दरेकर यांनी 1995 च्या निवडणुकीत भीमराव धोंडे यांचा पराभव केला. पुढे 1999 ते 2014 या कालावधीत म्हणजे जवळपास 19 वर्षे आमदारकीपासून धोंडे दूरच राहिले. याकाळात काँग्रेस, अपक्ष असे अनेक प्रयोग धोंडे यांनी केले. पण यश आले नाही. शेवटी भाजपच्या लाटेत 2014 ला धोंडेच्या पदरात आमदारकी पडली ती सुरेश धस यांचा पराभव करूनच. सुरेश धस पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा धोंडे काँग्रेस पक्षात होते. सुरेश धस दुसर्‍यांदा आमदार झाले तेव्हा धोंडे अपक्ष होते. सुरेश धस तिसर्‍यांदा आमदार झाले तेव्हा धोंडे काँग्रेस पक्षात होते. आणि धोंडे स्वतः आमदार झाले तेव्हा ते भाजपत आहेत. सुरेश धस देखील जिल्हा परिषदेवर निवडून आले तेव्हा ते अपक्ष होते आणि दरेकर यांचे कार्यकर्ते होते. ते आमदारकीला निवडून आले तेव्हा ते भाजपत होते आणि दरेकर यांचे विरोधक झाले. ते दुसर्‍यांदा आमदार झाले तेव्हा धोंडेचे कट्टर विरोधक होते. ते तिसर्‍यांदा आमदार झाले तेव्हा धस राष्ट्रवादीत होते. आता ते विधान परिषदेवर निवडून आले तेव्हा ते पुन्हा भाजपत आलेले आहेत.

माजी आमदार साहेबराव दरेकर यांचा प्रवास देखील असाच राहिला आहे. अपक्ष म्हणून आमदार झाले तेव्हा ते शिवसेनेच्या गोटात होते. काही काळ ते राष्ट्रवादीशी, काही काळ ते काँग्रेसशी जवळीक साधून होते. तर काही काळ भाजपत देखील व्यतीत केला आहे. आता दरेकर आणि धस यांची सोयरीक जुळली आणि तिकडे भीमराव धोंडे यांच्या काळजात नक्कीच चरकले असणार कारण दोन प्रभावी कुटुंब नात्यात एकत्र आली तर आष्टी विधानसभेसाठी जयदत्त धस यांचा दावा पक्का होणार आहे. जयदत्त धस यांच्या नावाला विरोध झालाच तर साहेबराव दरेकर यांचे चिरंजीव उद्धव दरेकर यांचे नाव देखील पुढे केले जाऊ शकते. याची जाणीव आता सर्वांनाच झाली आहे. सुरेश धस आणि पंकजा मुंडे यांची जवळीक देखील धोंडे यांच्या पोटात गोळा आणणारी ठरणार आहे. सुरेश धस, भीमराव धोंडे आणि साहेबराव दरेकर यांची पक्षनिष्ठा सतत बदलती राहिली आहे. साहेबराव दरेकर यांना केवळ एकदा आमदारकी उपभोगता आली आहे. तर धस-धोंडे यांना प्रत्येकी तीन टर्म आमदारकी मिळाली आहे.

मुळात या तालुक्याचे राजकारण व्यक्ती आणि जात केंद्रित राहिलेले आहे. सुरेश धस यांना राष्ट्रावादीत सन्मान मिळत नाही असे वाटत होते. तो सन्मान पंकजा मुंडे यांनी मिळवून दिला. शिवाय आधी गोपीनाथ मुंडे व त्यानंतर पंकजा मुंडे यांना त्यांच्यासाठी विधिमंडळाचे दार उघडे केले आहे. त्यामुळे पंकजा यांच्याकडे सुरेश धस यांचा कल असणे स्वाभाविक आहे, मात्र अडचणीच्या काळात साथ दिलेल्या भीमराव धोंडे यांची पंकजा कशी समज काढणार हा देखील मोठा प्रश्न आहे.

पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक विजय गोल्हार जे जिल्हा परिषद अध्यक्षांचे पती आहेत ते देखील सुरेश धस यांचे जवळचे झाले आहेत. गोल्हार यांनी जयदत्त धस यांना आमदार करणार असा शब्द दिला आहे. त्यासोबत पाटोदा शिरूर कासार तालुक्यात भीमराव धोंडे यांच्याविषयी नाराजी आहे. ही नाराजी देखील पुढील निवडणुकीत अडचणीची ठरणार आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत काही धोंडे समर्थक जिल्हा परिषद सदस्यांनी सुरेश धस यांना मतदान करताना शेवटच्या दिवसापर्यंत विषय ताणून धरला होता. मतदान करण्यासाठी लागणारी औपचारिकता धस यांनी पूर्ण केल्यानंतरच मतदान केले होते. याचा त्रास पंकजा मुंडे यांना देखील झाला होता. ही बाब देखील पंकजा समर्थकांना विसरता येणार नाही.

राजकीय जुळवाजुळव

पंकजा मुंडे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे चित्र डोळ्यासमोर ठेवून राजकीय जुळवाजुळव करायला सुरुवात केली आहे. यात भीमराव धोंडे यांच्या राजकीय आयुष्याला धक्का लागू शकतो. धोंडे यांच्यासाठी राष्ट्रवादी व काँग्रेसची दारं बंद आहेत त्यामुळे धोंडेचे काय होणार हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.