होमपेज › Marathwada › धरण बीडचे, पाणीवाटप ठरवतात लातूरकर

धरण बीडचे, पाणीवाटप ठरवतात लातूरकर

Published On: Apr 22 2018 1:12AM | Last Updated: Apr 21 2018 10:30PMअंबासाखर : प्रतिनिधी

पाच शहराला पिण्याचे पाणी तसेच हजारो शेतकर्‍यांच्या शेतीला पाण्याचा पुरवठा करणारे मांजरा धरण बीड जिल्ह्यात असूनही पाणी वाटप समितीचे अध्यक्ष लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने ते बीड जिल्ह्याचे पाणी पळवत आहेत. शासनाने झालेली चूक दुरुस्त करून मांजरा धरणातील पाणी वाटप समितीचे अध्यक्षपदी जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांची निवड करावी अशी मागणी पाणीवाटप समितीचे सदस्य बजरंग सोनवणे यांनी केली. जेणे करून बीड जिल्ह्यातील केज व अंबाजोगाईतील नागरिकांवर अन्याय होणार नाही.

तीन वर्षांच्या दुष्काळानंतर मांजरा धरण भरले असताना लातूरकरांनी पाणी पळवल्यामुळे अंबाजोगाई, केज, धारूर, शहरासह अनेक खेड्यांवर पाणी टंचाईचे सावट घोंगावत असल्याच्या पार्श्वभूमीवर पाणी वाटप समितीवर सदस्य बजरंग सोनवणे म्हणाले की, मांजरा धरण होण्यासाठी शेतकर्‍यांनी जमिनी दिल्या ते शेतकरी बीड जिल्ह्यातील केज तालुक्याचे तसेच या धरणात थोडे बहूत पाणी उस्मानाबाद जिल्ह्यातून येते. धरणासाठी लातूर जिल्ह्याचेे कुठलेही योगदान नसताना राज्याच्या राजकारणात वरचष्मा असल्याने बीड जिल्ह्यातील मांजरा धरणातील पाणी वाटप समितीचे अध्यक्षपद लातूरकरांनी स्वतःकडे घेतले. पाणी टंचाई नव्हती तोवर याकडे कोणी पाहिले नाही. आता त्याची गरज जिल्हावासियांना पडत आहे. लातूरकरांनी धरणाचे व्यवस्थापन पाहणारे कार्यालयसुद्धा लातूरलाच ठेवल्याने बैठका लातूरलाच होतात. मांजरा धरणातील पाण्यावर लातूरची एमआयडीसी चालते.  धरण आमचे, पाणी आमचे, गरज आमची असे असताना अधिकार लातूर जिल्ह्याच्या पालकमंत्र्याकडे कशासाठी? मांजरा धरणातील पाणी वाटप समितीच्या अध्यक्षपदी बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांची नियुक्ती करावी. किमान अंबाजोगाई, केज, धारूर शहरातील नागरिकांवर अन्याय होणार नाही. 

Tags : Marathwada, Latur, determining, water, dispute