Sat, Aug 24, 2019 00:10होमपेज › Marathwada › आघाडीची भूमिका काय राहणार?

आघाडीची भूमिका काय राहणार?

Published On: May 12 2018 1:30AM | Last Updated: May 12 2018 12:24AMबीडः शिरीष शिंदे

लातुर-उस्मानाबाद- बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदारांची गोळाबेरीज करणे सध्या सुरु आहे. वरिष्ठ पातळीवरुनही ठिकठिकाणची माहिती नियमित घेतली जात आहे. मात्र एकाच पक्षात असलेले व कट्टर वैरी बनलेले नगराध्यक्ष डॉ. भारतभुषण क्षीरसागर व त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांच्या गटातील बीड नगर परिषदेतील नगर सेवक भाजपच्या की राष्ट्रवादीच्या उमेदवारास मतदार करतात हे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

नगराध्यक्ष. डॉ. भारतभुषण क्षीरसागर व त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांचा घरगुती वाद हा राजकीय स्टंट असल्याची चर्चा बीड नगर परिषद निवडणुकीपूर्वी होती. मात्र त्यानंतर संदीप क्षीरसागर यांनी उघडपणे आपले काका डॉ. क्षीरसागर यांच्या विरुद्ध दंड थोपटत नगर परिषद निवडणुकीच्या आखाड्यात उतरले. डॉ. क्षीरसागर यांचे 16 तर संदीप क्षीरसागर पुरस्कृत काकु नाना विकास आघाडीचे 19 नगर सेवक निवडून आले होते.  डॉ. क्षीरसागर यांचे नगर सेवक हे राष्ट्रवादीच्या तर संदीप क्षीरसागर यांचे उमेदवार अपक्षाच्या चिन्हावर निवडून आले होते. मागच्या कालावधीत संदीप क्षीरसागर हे  माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जवळ गेल्यामुळे आ. जयदत्त क्षीरसागर व नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागर यांनी पक्षापासून चार हात लांब रहाणेच पसंत केले होते. दरम्यान, पुन्हा क्षीरसागर बंधुची पक्ष श्रेष्ठी  पवार यांच्या सोबत जवळीकता वाढली आहे. 

लातुर-उस्मानाबाद- बीड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्षाला व्हीप बजावता येत नाही. तसेच बॅलेट पद्धतीने मतदान होणार असून एकाच वेळी सर्व चिठ्ठ्या एकत्र करुन मतमोजणी होणार आहे. त्यामुळे डॉ. भारतभुषण क्षीरसागर व संदीप क्षीरसागर यांच्या गटाचे नगर सेवक कोणाला मतदान करतात हा विषय औचित्याचा ठरणार आहे. डॉ. क्षीरसागर हे पक्षावर नाराज आहेत हीबाब अनेक प्रसंगातून समोर आली आहे तर संदीप क्षीरसागर हे माजी उपमुख्यमंत्र्याच्या जवळ आहेत. त्यामुळे  त्यांचे मतदान राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवाराला होईल मात्र डॉ. क्षीरसागर यांच्या भूमि केकडे अखेरपर्यंत लक्ष रहाणार आहे. 

वास्तविकतः सदरील निवडणुकीचा थेट परिणाम आगामी विधान सभा निवडणुकीवर होणार आहे. जिल्ह्यातील राजकारणाची पुढील दिशा देखील त्यातून बदलणार आहे.त्यामुळे पुढील गणिते ग्राह्यधरत काका-पुतणे आपला निर्णय घेणार यात शंका नाही.