Sun, May 26, 2019 20:50होमपेज › Marathwada › लातूर : मरण स्वस्त अन् प्रवास महाग

लातूर : मरण स्वस्त अन् प्रवास महाग

Published On: Dec 04 2017 9:35AM | Last Updated: Dec 04 2017 11:37AM

बुकमार्क करा

लातूरः शहाजी पवार

दोन वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला होता. नोकरीही लागली होती. मोठ्या उत्साहात पहिला पगार घेऊन त्याने गावचा रस्ता धरला होता. त्याचा परिवारही तेवढ्याच उत्कटतेने त्याची वाट पाहात होता; परंतु 18 नोव्हेंबर रोजी झालेल्या अपघाताने त्याच्या हाडामांसाचा चिखल केला. काळीज हेलावणारी दापेगावच्या तुकारामची ही हकीकत खराब रस्त्यामुळे आता लातूर जिह्यासाठी नित्याची होऊ पाहत आहे.

रस्ते ही विकासाची रक्‍तवाहिनी असते. ती निरोगी राहिली तर प्रवास सुखाचा होतो अन् प्रवाशी सुखरूप राहतो. तथापि, लातूर जिल्ह्यात मात्र ही वाहिनी पुरती खराब झाली आहे. जिल्ह्यात 992 किलोमीटर राज्यमार्ग असून त्यातील 694 किलोमीटरवर खड्डे स्वार झाले आहेत. 1378 किलोमीटर प्रमुख जिल्हामार्गापैकी 821 किलोमीटर रस्ता खड्ड्याने जायबंदी केला आहे. 46 अपघातप्रवण क्षेत्र आहेत.

अवैध दुभाजकाला तर सीमाच नाही. 2014-2016 या कालवधीत या रस्त्यावर अपघाताने हजारी ओलांडली. 1906 अपघात झाले. त्यात 1263 नागरिक जखमी झाले तर 698 जणांचा मूत्यू झाला. यातील 50 टक्क्यांपेक्षा अधिक अपघात खड्ड्यांमुळे झाले. लातूर-निलंगा मार्गावर 14 दिवसांतील तीन अपघातांनी 13 जणांचा बळी घेतला. हे सारे घडत असताना त्याची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून करावयाची उपाययोजना मात्र फाईलीतच राहिली आहे. 
सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी लातूरच्या रस्ता दुरुस्तीवर समाधानाचे ट्विट करून एक प्रकारे लातूरकरांची चेष्टाच केली आहे. संकटातून शहाणपण जागले तर संकटाचा सामना सदोदित करावा लागत नाही; परंतु संकटाला सहज घेतले तर ते पुन्हा कुण्या निष्पापाचा गळा घोटते. याची कैकदा प्रचिती येऊनही व्यवस्थेत शहाणपण जागले नाही.