Mon, May 20, 2019 20:07होमपेज › Marathwada › शेती मशागतीची कामे अंतिम टप्प्यात 

शेती मशागतीची कामे अंतिम टप्प्यात 

Published On: Jun 03 2018 1:15AM | Last Updated: Jun 02 2018 11:26PMसोनपेठ : प्रतिनिधी

मराठवाड्यात सलग चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती आहे. दिवसेंदिवस त्याची दाहकता सर्वांनाच जाणवत आहे. यातच मागील दोन ते तीन वर्षांत तालुक्यात दुष्काळ आणि यावर्षी बोंडअळी झाल्यामुळे शेतकरी पूर्णतः हतबल झाला आहे. शासनाने बोंडअळीसंदर्भात संवेदनशील भूमिका घेत शेतकर्‍यांच्या खात्यावर 4 कोटी 20 लाख रुपये जमा केले. सोनपेठ तालुक्यातील शेतकरी गत दोन ते तीन वर्षांपासून अनेक संकटांना तोंड देत आहेत. शेतकरी यावर्षी पुन्हा नव्या जोमाने शेतीच्या कामाला लागून शेती मशागतीचे कामे अंतिम टप्प्यात आणत पेरणी योग्य केले आहे. 

मृग नक्षत्राच्या काही दिवसांपूर्वी मशागतीला  बळीराजा सर्व संकटे विसरून नव्या जोमाने कामाला लागला. हजारो हेक्टर शेत जमिनीतील पिकांचे वेळेवर पाऊस न पडल्याने नुकसान झाले. शेंद्री बोंडअळीने कपाशीला घरघर लागली. यावर पेरणीसाठी बी-बियाणांसाठी खर्च करून वरुणराजाच्या अवकृपेने वेळेवर पाऊस न पडल्याने शेतकर्‍यांची केवळ निराशा झाली. शेतात पिके नाहीत, जनावरांना वैरण नाही आणि पिण्यासाठी पाणी नाही, अशी परिस्थिती झाली.

यात नव्या जोमात शेतकर्‍याने मशागतीचे काम अंतिम टप्प्यात आणले. बी-बियाणे रासायनिक खतांचे भाव गगनाला भिडल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. पिकाला सुरक्षा मिळावी, यासाठी विमा मिळतो, पण यातही शेतकर्‍यांच्या पदरी निराशा आली. परिणामी कर्जबाजारी होऊन दिवसभर शेतातील पिकांची मशागत केली जाते. मागील दोन-तीन वर्षांपासून शेतकरी नैसर्गिक संकटाला तोंड देत आहे. यामुळे मराठवाड्यात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या करत आहे. त्यातच शासनाच्या तुटपुंजी अनुदानामुळे शेतकर्‍यांची निराशा झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.  

एकंदरित तालुक्यात पूर्णत: दुष्काळी परिस्थिती आहे. गतवर्षी खरीप हंगामात एकूण 17 हजार 40 हेक्टरवर नगदी पीक समजल्या जाणार्‍या कापसाची लागवड केली होती, परंतु कापसावर शेंद्री बोंडअळीने आक्रोश दाखवल्यामुळे सर्व क्षेत्रांवर नुकसान झाले. परिणामी शेतकर्‍यांचे आर्थिक गणित कोलमडले.  दरम्यान शासनाने   पंचनामे करण्याचे आदेश दिले. यात पहिल्या टप्प्यात तालुक्यात 19 गावांतील 7 हजार 636 हेक्टरवर कापसाची लागवड केली होती. त्यात 8 हजार 843 शेतकर्‍यांना खात्यावर 4 कोटी 20 लाख 450 रुपये जमा झाले. ज्या शेतकर्‍यांचे बँक खाते नसेल त्यांना बँकेने काढून द्यावेत, असे आदेश शासनाने बँकेला दिले. याबाबत महसूल विभागाकडून गावनिहाय यादी जिल्हा सहकारी बँकेकडे सुपूर्त केली आहे.