होमपेज › Marathwada › जिल्ह्यातील ग्रामीण भागात सूर्योदय परिवाराचे मोठे कार्य

जिल्ह्यातील ग्रामीण भागात सूर्योदय परिवाराचे मोठे कार्य

Published On: Jun 13 2018 1:34AM | Last Updated: Jun 12 2018 10:32PMबीड : प्रतिनिधी

राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त समजताच बीडमध्ये अनेकांना धक्का बसला. महिनाभरापूर्वीच 9 मे रोजी भय्यूजी महाराज बीडमध्ये मुक्कामी होते. बीड जिल्ह्यातील सिंचन वाढावे, शेतकरी आत्महत्या होऊ नये, सेंद्रिय शेतीला बळकटी मिळावे, शेतकर्‍यांच्या मुलांनी शिक्षण घ्यावे, आरोग्य अशा अनेक योजना ते भूमिसुधार अभियान माध्यमातून बीड जिल्ह्यातील 150 गावांमध्ये राबविणार होते. याचे त्यांनी नियोजन केले होते. यासाठी त्यांनी दोन दिवस अनेकांच्या गाठी-भेटी घेत या अभियानचे उद्घाटनही केले होते.  

राष्ट्रसंत भय्यूजी महाराज आणि बीडकरांच्ये गेल्या सहा ते सात वर्षांपासून घनिष्ठ नाते होते. या नात्यातूनच त्यांनी बीडमध्ये अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले. 2012 पासून बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या आत्महत्येचा मुद्दा राज्यभर गाजतो आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्या होत असल्याने राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांनी शेतकर्‍यांना बळ देण्यासाठी अनेक उपक्रम राबविले.  महिनाभरापूर्वीच भय्यूजी महाराज बीडमध्ये आले होते. यावेळी त्यांनी सूर्योदय परिवाराच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या भूमिसुधार अभियानचे उद्घाटन केले होते. बीड जिल्ह्यातील 150 गावांमध्ये राबविण्यात येणार्‍या भूमिसुधार अभियानचे उद्घाटन करताना 100 सायकलचे वाटप करण्यात आले होते.

या अभियानमधून शेतकर्‍यांना नि:शुल्क सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण, दहा हजार मुलांना शालेय साहित्य वाटप, अडीच हजार आत्महत्याग्रस्त व गरजू कुटुंबाना धान्य वाटप, आत्महत्या केलेल्या 25 शेतकर्‍यांच्या पत्नीस रक्षाबंधनादिवशी बैलजोडी वाटप, पशू-पक्षांसाठी पाण्याचे हौद, स्कूल बस, 15 हजार शेतकर्‍यांना बियाणे वाटप आदी कार्यक्रम घेण्याचा त्यांनी संकल्प केला होता. यासह गरजू रुग्णांवर दहा लाख रुपयांपर्यंतचे उपचार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. याच अभियान मधून सक्षम समाज निर्माण करण्याचे काम यासह महिलांना प्र्रशिक्षण, खेळाडूंना प्रशिक्षण, संस्कार केंद्र, सॅनटरी पॅड मशीन, व्यसमुक्ती, गुन्हेगारांना सुधारणे, लहान मुलांवर योग्य संस्कार करण्याचे नियोजन करण्यात आले होते.  

जिल्ह्यात सध्या भूमिसुधार अभियानची जोरदार तयारी सुरू होती, शेतकर्‍यांना बियाणे वाटप करण्याचेही नियोजन सुरू होते, असे असतानाच भय्यू महाराजांनी धक्कादायक निर्णय घेतल्याने अनेकांचे मन सुन्न झाले. शहरातील चौका-चौकात व दुकानांवर भय्यूजी महाराजांचीच चर्चा करून नागरिकांनी त्यांच्या आठवणीला उजाळा दिला.बीड पालिकेत श्रद्धांजली : राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांचे बीड जिल्ह्यात मोठे कार्य आहे. त्यांच्या सूर्योदय परिवारामध्ये बीडमधील अनेकांचा सहभाग आहे. त्यांचे कार्यही जिल्ह्यात मोठे आहे. त्यामुळे भय्यूजी महाराज यांना मंगळवारी बीड पालिकेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.