Mon, Jul 15, 2019 23:58होमपेज › Marathwada › ‘दाम करी काम’चा गेवराईकरांना अनुभव

‘दाम करी काम’चा गेवराईकरांना अनुभव

Published On: Jul 22 2018 1:01AM | Last Updated: Jul 21 2018 10:32PMगेवराई : विनोद नरसाळे

येथील उपअधिक्षक भूमिअभिलेख कार्यालयाचा रामभरोसे कारभार चव्हाट्यावर आला आहे. दाम दिले तरच काम होते नसता कामात खुटी मारून शेतकरी, नागरिकांना हैराण केले जाते. त्यामुळे हे कार्यालय एकप्रकारे शेतकर्‍यांना लुटणारे केंद्रच बनल्याचे चित्र आहे.

या कार्यालयाविषयी नेहमीच तक्रारी असताना देखील प्रशासनाकडून डोळेझाक केली जात असल्याने शेतकर्‍यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे, तसेच याठिकाणी आओ जाओ घर तुम्हारा या तोर्‍यात अधिकारी, कर्मचारी वावरत असून यांच्यावर कोणाचा तरी वॉच आहे की नाही? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.

तालुक्यातील शेतीसंबंधी लागणारे नकाशे, विविध कागदपत्रे तसेच जमीन मोजणी, हद्दकायम आदी विविध शेतकर्‍यांची महत्त्वाची कामे येथील उपअधिक्षक भूमिअभिलेख कार्यालयातून होतात. मात्र येथील उपअधिक्षक भूमिअभिलेख कार्यालयात शेतकर्‍यांची सर्रास लूट सुरू असल्याचा आरोप शेतकर्‍यांतून होत आहे. शिपाई ते उपअधिक्षकापर्यंत सर्वांनाच शेतकर्‍यांकडून हात ओले करून घेण्याची  अपेक्षा असून ‘हमाम मे सब नंगे’ या प्रकारे येथील कारभार सुरू आहे. पैसा फेको, तमाशा देखो या याप्रमाणे येथे जो पैसा देईल त्याची कामे तत्काळ होत असल्याने सर्वसामान्य शेतकर्‍यांना मात्र हेलपाटे मारावे लागत आहेत. शेतकर्‍यांचा याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे, तसेच येथील कर्मचारी शेतकर्‍यांना उद्धट भाषा वापरत असून मनमानी कारभार हाकत आहेत. त्यामुळे या कार्यालयावर वरिष्ठांचा धाक आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान शासन नियमाप्रमाणे रितसर फीस भरूनही वेळेवर कामे होत नसल्याने शेतकर्‍यांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. अधिकारी, कर्मचारी पैसे घेऊन जमीन मोजणीच्या तारखामध्ये आदलाबदल करत असल्याचा आरोपही शेतकर्‍यांतून होत आहे. त्यामुळे या कार्यालयात शेतकर्‍यांची सर्रासपणे लूट होत असताना वरिष्ठ देखील याकडे डोळेझाक करत आहेत. तरी याठिकाणी शेतकर्‍यांची होणारी लूट थांबवावी अशी मागणी शेतकर्‍यांतून होत आहे.  

शेतकर्‍यांची या कार्यालयात होणारी अडवणूक व येणार्‍या समस्यांबात उपअधिक्षक वि. वि. पवार यांना विचारले असता आमचा कारभार व्यवस्थित सुरू असल्याचे सांगत हाताची घडी घालत तोंडावर बोट ठेवले व अधिक बोलण्यास टाळले. शेतकर्‍यांच्या कामासंदर्भात ते काय भूमिका घेतात, याकडे आता शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.