Fri, Aug 23, 2019 14:45होमपेज › Marathwada › मुलींचा जन्मदर कमी असतानाही जनजागृतीचा अभाव

मुलींचा जन्मदर कमी असतानाही जनजागृतीचा अभाव

Published On: Apr 06 2018 2:21AM | Last Updated: Apr 05 2018 11:45PMआर्वी : प्रतिनिधी

महिला आणि बालविकास विभाग मुलींचा जन्माचा दर वाढावा या दृष्टीने विविध योजना अमलात आणत आहे. यामध्ये गर्भलिंग निदान कायद्याची कठोर अंमलबजावणी. या स्त्री जन्माचे स्वागत, माझी कन्या भाग्यश्री अशा योजनांसह मुलीच्या संगोपनासह शिक्षणाकडेही लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे, परंतु मुलींचा कमी जन्मदर असलेल्या शिरूर तालुक्यात पुरेशी जनजागृती झाल्याचे दिसत नाही.

मुलीच्या जन्माचे स्वागत आणि संगोपनअंतर्गत एकुलती एक मुलगी असल्यास मुलीच्या पालकांच्या खात्यात पाच हजार रुपये जमा होतील, तर तिच्या आजी-आजोबांना प्रोत्साहनात्मक कमाल पाच हजार रुपयांपर्यंत सोन्याचे नाणे भेट देण्यात येणार आहे. यासह विविध योजना समोर येत असताना याविषयी सामूहिकरित्या प्रबोधन होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, परंतु विभागाकडून योग्य जनजागृती होत नसल्याने लाभार्थी या योजने पासून वंचित राहत आहेत.

ग्रामीण भागात काहीजणांचा आजही मुलगा हवा हा अट्टाहास असल्याने योजनांचे लाभार्थी कमी आहेत. शिरुर कासार  तालुक्यातही मुलींचे प्रमाण कमी आहे. यामुळे गावपातळीवर आजही वंशाच्या दिव्यासाठी असणारा अट्टहास पाहता महिला बाल कल्याण विभागाने ज्या गावात मुलींचे दर हजारी प्रमाण मुलांपेक्षा जास्त आहे, अशा ग्रामपंचायतीस पाच लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे.

यासाठी महिला बालविकास सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समितीमार्फत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती गठीत करून कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे राज्यस्तरावरून नमूद करण्यात आले आहे, परंतु अनभिज्ञ असल्याचे कारण देताना महिला बालकल्याण तसेच एकात्मिक बालविकास सेवा योजना यांच्यापर्यंत या योजनेची माहिती लाभधारका पर्यंत पोहोचली नसल्याने  संबंधित अधिकार्‍यांनी सांगत आहेत.

अजित बालिका ठरली सर्वोत्तम

आ. विनायक मेटे यांनी राष्ट्रवादीमध्ये असताना तालुक्यातील मुलीचा जन्मदर वाढवा या उद्देशाने राबवलेल्या अजित बालिका योजनेला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. या योजनेच्या माध्यमातून मुलीच्या जन्मताच तिच्या नावे पाच हजार रुपये बँकेत फिक्स ठेवीमध्ये जमा केले होते. यांच्या माध्यमातून तालुक्यातील हजारे नागरिकांनी याचा लाभ घेतलेला आहे, परंतु यानंतर भक्कम पाठबळ देणारी दुसरी योजना अमलात आली नसल्याने ही योजनाच सर्वोत्तम ठरली असल्याचे नागरिकांत बोलले जात आहे.

 

Tags : Marathwada, Marathwada news, childbirth, awareness,