Fri, Apr 26, 2019 03:46होमपेज › Marathwada › जिल्हा ग्राहक मंचात सुविधांचा अभाव

जिल्हा ग्राहक मंचात सुविधांचा अभाव

Published On: Apr 28 2018 1:44AM | Last Updated: Apr 27 2018 11:21PMपरभणी : प्रतिनिधी

परभणी जिल्हा ग्राहक मंचातर्फे मार्च 2018 अखेर एकूण 5 हजार 906 नोंदणी झालेल्या प्रकरणांपैकी 5 हजार 778 प्रकरणांचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.  दाखल प्रकरणांपैकी अद्यापही 128 प्रकरणे प्रलंबित आहेत. ग्राहकांवरील अन्याय दूर करण्यासाठी असलेल्या जिल्हा ग्राहक न्यायालयात मात्र मोठ्या प्रमाणात सुविधांचा अभाव असल्याने ग्राहक मंचा संदर्भातील जाणीव जागृती करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. 

शासनाने 1990 पासून जिल्हा ग्राहक न्यायमंचाच्या माध्यमातून ग्राहकांच्या समस्यांची सोडवणूक करणे सुरू केले आहे. घरगुती वापरा संदर्भातील वस्तूंविषयी तक्रारी, इन्सुरन्स, मेडिकल, बँक, एल.आय.सी, खरेदीव्दारे झालेली फसवणूक, एम.एस.ई.बी., पोस्ट ऑफिस, बी-बियाणे इत्यादी संदर्भातील तक्रारींची नोंद करण्यात येते.  यासाठी  शासनाकडून प्रकरण व रक्‍कमनिहाय शुल्क आकरण्यात येते. 1 लाखांपर्यंत 100, 5 लाखांपर्यंत 200, 10 लाखांपर्यंत 400, 20 लाखांपर्यंत 500 रुपये शुल्क आकरण्यात येते. ग्राहकमंचाकडे  प्रकरण दाखल करण्यासाठी वकिलाची अनिवार्यता  नसून ग्राहक स्वतः होऊन देखील तक्रार  नोंद करू शकतो.

दाखल झालेल्या  प्रकरणावर न्याय प्रक्रियेनुसार सुनावणी होत असते. तक्रारदार व विरोधी पक्षकार दोघेही वेळेवर सुनावणीस उपस्थित राहिले तर निर्णय लवकर देणे सोपे होते, परंतु या न्यायिक प्रक्रियेत अनेक अडचणी येत आहेत. कारण सुनावणीसाठी दोन्हींपैकी एक जरी गैरहजर राहिला तर सुनावणी होणे शक्य होत नाही. परिणामी प्रकरणाच्या निर्णयास विलंब होतो. शासनाची सर्व कार्यालये ऑनलाइन झाली असली तरी ग्राहक न्यायालयाकडे अद्याप ऑनलाइन तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध नाही. शिवाय  जिल्हा ग्राहक मंचात ऑनलाइनच्या सुविधा उपलब्ध नाहीत.

लॅपटॉप, मुबलक प्रमाणात इंटरनेट, संगणक तुटवडा विशेषतः मनुष्यबळाची उणीव असल्याने ती भरून काढणे महत्त्वाचे आहे. जिल्हा ग्राहक मंचात अद्यापही 11 जागा रिक्‍त असून मोजक्याच कर्मचार्‍यांवरच कामाचा भार पडत आहे. शिवाय कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरलेली आहे. कर्मचार्‍यांची कमतरता असल्याने कार्यालयातही सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. कर्मचार्‍यांनी वृक्षारोपण करून परिसराला स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु बाजूलाच महानगरपालिकेचे शौचालय असल्यामुळे नागरिकांची ये-जा सुरू असल्याने नेहमीच अस्वच्छता पसरत असल्याने कार्यालयीन अधिकारी व कर्मचार्‍यांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन ग्राहक मंचात असलेल्या अडचणी  दूर कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.     

ग्राहकांमध्ये जाणीव जागृती घडवून आणणे महत्त्वाचे

जिल्ह्यातील ग्राहकांच्या तक्रारीचे प्रमाण अत्यल्प असून सर्वसामान्य ग्राहक तक्रार करण्यासाठी धजावत नसल्याचे चित्र निर्माण झालेले आहे. यासाठी  जिल्ह्यातील ग्राहकांमध्ये जाणीव जागृती घडवून आणणे महत्त्वाचे आहे. शासनाने ग्राहकांवरील अन्याय दूर करण्यासाठी स्थापन केलेल्या ग्राहकमंचात तक्रार देऊन अन्यायकर्त्यास जाब विचारायला  हवा, परंतु वास्तविक पाहता बाजारपेठ व इतर ठिकाणी ग्राहकांची लयलूट व फसवणूक होत असतानादेखील ग्राहक नुकसान सहन करीत आहेत.