परभणी : प्रदीप कांबळे
जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवर कार्यरत असलेल्या अधिकारी-कर्मचार्यांना कर्तव्य बजावताना गैरसोय होऊ नये, यासाठी त्या त्या ठिकाणी वसाहती उभारून निवासस्थाने बांधून देण्यात आलेली आहेत. बहुतांश ठिकाणच्या पोलिस वसाहतींची दुरवस्था झालेली आहे. परभणी शहरात जिल्हा मुख्यालयाच्या पाठीमागे असलेल्या पोलिस वसाहतीत सोयी-सुविधांचा अभाव असल्याने कर्मचार्यांसह त्यांच्या कुटुंबीयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पोलिस वसाहतींमधील अनेक प्रकारच्या सुविधा बंद अवस्थेत असल्याने कर्मचार्यांच्या कुटुंबीयांना विविध अडचणींतच वास्तव्य करावे लागत आहे. कर्मचार्यांच्या कुटुंबीयांसाठी असलेल्या सुविधा त्वरित उपलब्ध व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
वसाहत परिसरात मनोरंजन, खेळ व आरोग्य सुविधांची दयनीय अवस्था असल्याने कर्मचारी समस्याग्रस्त असल्याचे दिसून येत आहे. पोलीस रुग्णालयात येणार्या कर्मचारी रुग्णांसाठी पिण्याचे पाणी, शौचालय उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णांची गैरसोय होत आहे. कर्मचार्यांच्या लहान बाळांसाठी असणारे पाळणाघर व अंगणवाडी नावालाच सुरु असल्याचे चित्रही पहायला मिळत आहे.
कारण या ठिकाणी आवश्यक सुविधांचा मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. अनेक अडचणींचा सामना करत जीवन जगत असलेल्या कर्मचार्यांच्या मनोरंनासाठी असणारे पोलीस वसाहतींमधील अनेक साधणे व उपकरणे मोडकळीस आल्याने कर्मचार्यांना या साधनांचा वापर करण्यासाठी इतरत्र जावे लागत आहे. वसहातींमध्ये असलेल्या चाईल्ड स्पोर्ट पार्कची दयनीय अवस्था असून वृध्दांसाठी क्षणभर विश्रांतीसाठी जागाच नसल्याने कर्मचार्यांच्या नातेवाईकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.
मैदानावर दारूड्यांचा वावर
कर्मचार्यांचे कुटूंबियांसाठी असलेल्या मैदानावर रात्री उशिरापर्यंत मद्यसेवन करत बसलेल्यांकडून त्रास होत आहे. मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या कर्मचार्यांना मैदानावर फोडण्यात आलेल्या काचा व इतर केरकचर्यामुळे मैदानावर फिरणे दुखापतीस आमंत्रण असल्याचे जाणवत आहेत. या मैदानावर पथदिवे पुरेशा प्रमाणात नसल्याने अंधाराचा गैरफायदा घेवून टोळक्याने बसणारी मंडळी ये-जा करणार्या महिला कर्मचारी व नातेवाईकांना नाहक त्रास देतात यामुळे रात्रीच्या वेळी कर्मचारी दहशतीखाली वास्तव्य करीत असल्याचे वास्त या परिसरात निर्माण झाले आहे.