Sun, Aug 25, 2019 07:59होमपेज › Marathwada › जिल्ह्यात 3 लाख 56 हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी!

जिल्ह्यात 3 लाख 56 हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी!

Published On: Apr 26 2018 2:02AM | Last Updated: Apr 25 2018 11:00PMहिंगोली : गजानन लोंढे

यंदाच्या खरीप हंगामासाठी 3 लाख 56 हजार 395 हेक्टरवर विविध पिकांच्या पेरणीचा अंदाज कृषी विभागाने व्यक्‍त केला आहे. कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामासाठी तयारी पूर्ण करण्यात आली असून, खरीप हंगामासाठी 58 हजार 120 मेट्रिक टन खताचा साठा मंजूर झाला आहे. कृषी विभागाने 1 लाख 10 हजार 874 क्‍विंटल बियाण्यांची मागणी नोंदविली आहे. मागील वर्षी कपाशीवर आलेल्या गुलाबी बोंडअळीमुळे कपाशीचे क्षेत्र घटणार असून सोयाबीनच्या पेर्‍यात अडीच हजार हेक्टरने वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्‍त करण्यात आला आहे.

खरीप हंगामासाठी दीड महिना शिल्‍लक असल्याने जिल्हा प्रशासनाच्या वतीने खरीप हंगामाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मागील वर्षी खरीप हंगामात तीन लाख 57 हजार 635 हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा पेरणी क्षेत्रात 1 हजार हेक्टरची घट होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्‍त केला आहे. यावर्षी 3 लाख 56 हजार 395 हेक्टरवर पेरणी होईल, असे गृहीत धरून खतासह बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली आहे. गतवर्षी गुलाबी बोेंड अळीमुळे कपाशीचे नुकसान झाले. मागील वर्षी 54 हजार हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली होती; परंतु यंदा कपाशीच्या लागवड क्षेत्रात 20 टक्के घट होण्याचा अंदाज व्यक्‍त करण्यात आला असून कपाशी लागवड क्षेत्रात 11 हजार 22 हेक्टरने घट होऊन 43 हजार 684 हेक्टरवर कपाशीची लागवड होईल, असे गृहीत धरण्यात आले आहे. सोयाबीनच्या क्षेत्रात मागील वर्षापेक्षा अडीच हजार हेक्टरने वाढ होऊन 2 लाख 30 हजार 511 हेक्टरवर पेरणीचा अंदाज व्यक्‍त करण्यात आला आहे. त्या खालोखाल तूर 46 हजार 997, मूग 12 हजार 472, उडीद 8 हजार 92, ज्वारी 10 हजार 26, मका 2 हजार 623, तीळ 231 हेक्टरवर पेरणी होईल, असा अंदाज कृषी विभागाच्या वतीने व्यक्‍त करण्यात आला आहे. कृषी विभागाच्या वतीने बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली आहे. यामध्ये महाबीजकडे 7 हजार 342.13 क्‍विंटल व खासगी बियाणे कंपन्याकडील मिळून 1 लाख 10 हजार 784.97 क्‍विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली आहे. यामध्ये ज्वारी 751, मूग 748, तूर 3 हजार 877, कपाशी 1 हजार 92, मका 118, तीळ 5.84, सोयाबीन 1 लाख 3 हजार 733 क्‍विंटल बियाण्यांचा समावेश आहे.

बियाण्यांबरोबरच खरीप हंगामासाठी मिश्र व संयुक्‍त खताची एकूण 58 हजार 120 मेट्रिक टन खताचा साठा मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये युरिया 17 हजार 260, डीएपी 10 हजार 810, पोटॅश 4 हजार, एनपीके 17 हजार 340, सुपर फॉस्फेट 8 हजार 710 टन आदी खतांचा समावेश आहे.मागील वर्षीपेक्षा यावर्षी सोयाबीन व तुरीच्या क्षेत्रात वाढ होणार आहे, तर कापूस 20 टक्के घटेल असा अंदाज असून सोयाबीन व तुरीचे बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावेत, यासाठी मागणी नोंदविण्यात आली आहे. बियाण्यांबरोबरच खताचाही साठा मंजूर झाल्यामुळे शेतकर्‍यांना अडचण येणार नाही, अशी प्रतिक्रिया जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे यांनी दिली.

Tags : Marathwada, Kharip,  sowing, 3 lakh 56 thousand, hectare,  district