होमपेज › Marathwada › कयाधू पुनरुज्जीवनासाठी जलसंधारणाची कामे

कयाधू पुनरुज्जीवनासाठी जलसंधारणाची कामे

Published On: Mar 15 2018 1:19AM | Last Updated: Mar 14 2018 11:37PMहिंगोली : प्रतिनिधी

हिंगोली जिल्ह्याची जीवन वाहिनी म्हणून ओळख असलेल्या कयाधू नदीच्या शाश्‍वत पुनरुज्जीवनासाठी लोकसहभागातून माथा ते पायथा जलसंधारणाची कामे हाती घेण्यात येणार आहे. यासाठी जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा हे दि. 3 एप्रिल रोजी मार्गदर्शन करणार आहे. तब्बल 1 लाख 13 हजार हेक्टर क्षेत्रावर जलसंधारणाची कामे करून नदी बारमाही कशी होईल, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

कयाधू नदी ही मराठवाडा-विदर्भाच्या सीमेवर असलेल्या वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील अगरवाडी-कंकरवाडी येथून उगम पावते. ही नदी हिंगोली जिल्ह्यातूून 84 कि. मी. वर वाहत जाऊन समोर पैनगंगा नदीला मिळते; परंतु मागील काही वर्षांपासून वातावरणातील बदल, वैश्‍विक तापमान, पर्यावरणाचा होत असलेला र्‍हास यातून एकेकाळी बारमाही वाहणारी नदी हंगामी झाली आहे. त्यामुळे या नदीकाठी असलेले 154 गाव, वाड्या, वस्त्यांवर दुष्काळाचे सावट पसरले आहे. याअंतर्गत 4 हजार 832 कुटुंब व त्या कुटुंबातील 2 लाख 42 हजार 152 नागरिकांना याचे परिणाम भोगावे लागत आहेत. हा कलंक पुसून टाकण्यासाठी उगम ग्रामीण विकास संस्थेच्या माध्यमातून लोकांना आव्हान करण्यात आले आहे.

लोकसहभागातून ही चळवळ राबविली जाणार असून, मुंबई येथील ईडलगिव्ह फाउंडेशनने नदीचे माथा ते पायथा सर्वेक्षण केले असून, नदी पुनरुज्जीवनासाठी जलसंधारणाची कामे करण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले आहे. दि. 3 एप्रिल रोजी जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह राणा हे या चळवळीतील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. 

यांचा असणार सहभाग

कयाधू पुनरूजीवनासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, नाबार्ड, कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, जलयुक्‍त शिवार अभियान, रोजगार हमी योजना, जैव विविधता संवर्धन मंडळ, पर्यावरण संतुलन संवर्धन मंडळ असे शासनाचे विविध विभाग सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर ही संकल्पना पूर्णत्वास येण्यासाठी जलबिरादरी, आफार्म, केरिंग फ्रेंड, आयसर, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, ईडलगिव्ह यांचाही सहभाग राहणार असल्याची माहिती उगमचे जयाजी पाईकराव यांनी दिली.