होमपेज › Marathwada › कारगील युद्धाने उंचावले सैन्यदलाचे मनोबल  

कारगील युद्धाने उंचावले सैन्यदलाचे मनोबल  

Published On: Jul 16 2018 1:23AM | Last Updated: Jul 16 2018 12:02AMअंबाजोगाई  : प्रतिनिधी 

कारगील युद्धाने देशाच्या सैनिकांचे मनोबल उंचावले आहे. आता शत्रुशी दोन हात करायला हत्तीचे बळ मिळाले आहे. कारगील विजय हा जगाला भारताची ताकद दाखवून देणारा ठरला. तरुणांनी सैन्यदलात भरती होऊन देश सेवा करावी, असे आवाहन सेना मेडल विजेते सुभेदार रामकिशन यांनी राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांना केले.

अंबाजोगाई येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने मेजर एस. पी. कुलकर्णी यांच्या पुढाकारातून ‘शुरा तुला वंदीतो’ या उपक्रमांतर्गत सेना मेडल विजेते सुभेदार रामकिशन व हवालदार प्रशांत कुमार यांचा सत्कार शनिवारी योगेश्वरी महाविद्यालयात  आयोजित करण्यात आला होता. संस्था अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे, कार्यकारी उपाध्यक्ष अ‍ॅड. शिवाजीराव कराड, सहसचिव माणिकराव लोमटे, मेजर एस. पी. कुलकर्णी यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.

राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना सुभेदार रामकिशन म्हणाले की, कारगीलचे युद्ध जिंकणे देशासाठी अत्यंत महत्वपूर्ण होते. या लढाईमध्ये सैन्यदलातील जवानांनी जीवावर उदार होऊन लढाई लढली. कारगील विजयाने देशाच्या सैनिकांचे मनोबल उंचावले आहे. अठरा वर्षांनंतरही हे युद्ध आम्हाला ताजेच वाटते. कारगील युद्धात शत्रुसोबत केलेले दोन हात अविस्मरणीय राहणार आहेत. कारगील येथील अतिबर्फ वृष्टीमुळे व खराब वातावरणामुळे विमानाचा देखील उपयोग होत नसे. तीन-तीन दिवस प्राथमिक उपचारावरच राहवे लागले, परंतु आम्ही जिद्द हारलो नाही. भारताने कारगिलमध्ये पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय मिळवला व ‘ऑपरेशन विजय’ मोहीम फत्ते केल्याचे ते म्हणाले. 

राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव

मेजर रामकिशन हे मुळचे राजस्थान येथील आहे. कारगील युद्धात खांद्याला गोळी लागून ते जखमी झाले. अशा अवस्थेतही त्यांनी पाकिस्तानच्या चार सैनिकांना कंठस्नान घातले. या त्यांच्या शौर्याची दखल घेऊन त्यांना तत्कालीन राष्ट्रपदी प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते सेना मेडल देऊन गौरविण्यात आले, दरम्यान यावेळी त्यांनी युद्धातील अनेक प्रसंग सांगितले.