Fri, May 24, 2019 02:52होमपेज › Marathwada › जिंतूरमध्ये गहू, ज्वारीचे नुकसान 

जिंतूरमध्ये गहू, ज्वारीचे नुकसान 

Published On: Feb 12 2018 2:49AM | Last Updated: Feb 12 2018 2:48AMजिंतूर ः प्रतिनिधी 

तालुक्यात सकाळी 9 वाजता वादळी वार्‍यासह जोराचा पाऊस झाल्याने गहू, ज्वारी, हरभरा, करडई या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकर्‍यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. जिंतूर तालुक्यात शेतकर्‍यांना मागील तीन वर्षांपासून अस्मानी व सुलतानी संकटाने ग्रासले होते. यातच यावर्षी जूनमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली होती. यामुळे शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या, मात्र परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाचे नुकसान झाले होते. त्यातच यावर्षी प्रथमच कापसावर शेंदरी बोंडअळीचा हल्ला झाला. परिणामी शेतकर्‍याचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. 

म्हणून शेतकरी पुरता हवालदिल झालेला दिसून येत असताना पुन्हा अवकाळी पावसाने शेतकर्‍याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. तालुक्यात सकाळी 8 वाजेच्या सुमारास ढग दाटून येऊन पाऊस  व वार्‍यामुळे गहू,ज्वारी,हरभरा या पिकांचे नुकसान झाले आहे. यात काही ठिकाणी गहू व ज्वारी भुईसपाट झाली आहे. म्हणून शेतकर्‍यावर अवकाळी पावसाने केलेल्या हल्ल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. या नुकसानीतील पिकांची पाहणी करून तत्काळ भरपाई देण्याची मागणी होत आहे.


सेलू परिसराला गारपिटीने झोडपले

रविवार सकाळीच  वार्‍यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. दुपारी चारच्या सुमारास जोरदार पावसासह झालेल्या  गारपिटीने काढणीला आलेली ज्वारी, गहू, हरभरा पिके या अवकाळी पावसामुळे भुईसपाट झाली आहेत. यामुळे आर्थिक संकटात असलेल्या शेतकर्‍यांचे वर्षाचे आर्थिक नियोजन विस्कटले असल्याचे चित्र आहे.  दोन दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण होते.

त्यात रविवारी सकाऴी 6 वाजेच्या सुमारास पावसाने सुरुवात केली. अवकाळी पावसासह वादळी वारा यामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर तालुक्यात काही ठिकाणी गारांचा पाऊस पडला असल्याने रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. तर शहरात दुपारी 3:35 ते 3:50 तब्बल पंधरा मिनिटे गारांचा पाऊस पडल्याने रस्त्यावर गारांचे ढिग साचले होते.