Thu, Jul 18, 2019 08:19होमपेज › Marathwada › वाहन चालविताना चालकांनी सावधानता बाळगणे महत्त्वाचे : अप्पर जिल्हाधिकारी

वाहन चालविताना चालकांनी सावधानता बाळगणे महत्त्वाचे : अप्पर जिल्हाधिकारी

Published On: Apr 26 2018 2:02AM | Last Updated: Apr 25 2018 11:10PMपरभणी : प्रतिनिधी

अनेकदा अपघात चालकांच्या हलगर्जीपणामुळे घडत असतात. त्यामुळे वाहन चालविताना चालकाने सावधानता बाळगणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे यांनी केले.रस्ता सुरक्षा अभियान-2018 चा उद्घाटनपर कार्यक्रम प्रशासकीय इमारत परिसरात झाला, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास अप्पर पोलिस अधीक्षक विश्‍व पानसरे, राज्य परिवहनचे विभाग नियंत्रक जालिंदर सिरसाट, कार्यकारी अभियंता कोरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार, जिल्हा माहिती  अधिकारी अनिल आलूरकर यांची  उपस्थिती होती.

पुढे बोलताना अण्णासाहेब शिंदे म्हणाले की, रस्त्यावर वाहन चालवित असताना प्रत्येकाला पुढे जाण्याची घाई असते. यातून अपघातास निमंत्रण मिळत असल्याने स्पर्धा न करता थोडेसे 10 सेकंद वाट पाहून रस्ता रिकामा दिसल्यासच आपले वाहन ओव्हरटेक करणे योग्य राहील. तसेच वाहनांच्या तांत्रिक दोषामुळेही अनेकदा अपघात होत असल्याने वाहनांची सर्व्हिसिंग वेळेवर करावी. चालकांनी मद्य प्राशन करून वाहन चालवू नये. मोबाइलवर बोलतानाही वाहन चालवू नये, यामुळे लक्ष विचलित होऊन अपघात घडत असतो. आपली घरी कोणी तरी वाट पाहत आहे, याची आठवण चालकांनी सदैव मनात ठेवूनच वाहन चालवावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

वाहन चालविताना गतीवर नियंत्रण ठेवल्याने मोठा अनर्थ टळत असतो. त्यामुळे वेग नियंत्रित ठेवून आपली सुरक्षा आपणच करायला हवी. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानूसारअपघातग्रस्त व्यक्‍तीस मदत करणार्‍या व्यक्‍तींना पोलिस कुठल्याही चौकशीला बोलावणार नाहीत. यामुळे अपघातग्रस्त व्यक्तीस दवाखान्यापर्यंत पोहोचवून त्याचा जीव वाचविण्यास मदत करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थितांना केले. अप्पर पोलिस अधीक्षक पानसरे म्हणाले की, वाहन चालविताना अनुज्ञप्ती नेहमी सोबत बाळगावी तसेच वाहन चालविण्याची सुयोग्य पद्धती, नियमांचे काटेकोरपणे पालन करून अपघाताची संख्या कमी करता येऊ शकते. अपघातग्रस्त व्यक्तीस वेळेवर वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. 

यावेळी रस्ता सुरक्षा अभियान पुस्तिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच परिसरातील वाहनांना रिफ्लेक्टरही लावण्यात आले आणि प्रातिनिधिक स्वरूपात हेल्मेटचे वाटपही करण्यात आले. यावेळी  रस्त्यावरील गोल आकाराची फलके आदेश देणारी चिन्हे, त्रिकोणी आकाराची फलके, सावधान करणारी, आयातकार आकाराची फलके आदींची माहिती देणारी चिन्हे उपस्थितांना चित्रफितीच्या माध्यमातून दाखविण्यात आली. या कार्यक्रमास उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी व वाहन निरीक्षक, वाहन वितरक, ड्रायव्हिंग स्कूलचालक, वाहनचालक, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags : Marathwada,  important, drivers, cautious, driving