Tue, Jul 23, 2019 12:28होमपेज › Marathwada › काँग्रेसकडून लातूर लोकसभा मतदार संघासाठी  सर्वाधिक इच्छुक

काँग्रेसकडून लातूर लोकसभा मतदार संघासाठी  सर्वाधिक इच्छुक

Published On: Dec 07 2018 8:07PM | Last Updated: Dec 07 2018 8:06PM
लातूर : प्रतिनिधी 

लातूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या वतीने अगामी  निवडणूक लढवण्यासाठी शुक्रवारी तब्बल ५७ जणांनी मुलाखती दिल्या. इच्छुकांचा हा आकडा राज्यात सर्वाधिक असल्याची माहिती माजी आमदार तथा प्रदेश काँग्रेस  लोकसभा निरीक्षक चंद्रकांत छाजेड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या नंतर छाजेड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, इच्छुक हे सर्व स्तरातील असून काँग्रेसच्या विचारधारेला मानणारे आहेत. यात राजकारणी, व्यापारी, वकील, कॉर्पोरेटर, राजकारणी, शिक्षक, प्राध्यापक, निवृत्त सनदी अधिकारी, उद्योजक आदी विविध क्षेत्रातील नागरिकांचा समावेश आहे. यात महिलाही असून परजिल्ह्यातील इच्छुकांनीही मुलाखती दिल्या आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक इच्छुक लातुरात असून ही काँग्रेसची लोकप्रियता वाढत असल्याचा पुरावा असल्याचे ते म्हणाले. गत निवडणुकीत मोदी लाट होती, त्यामुळे आमच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. तथापि येत्या निवडणुकीत  या मतदारसंघातील जनता पराभवाचे उट्टे काढेल व काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पक्षासाठी केलेले कार्य, निवडणूक जिंकण्याचे मेरिट, जनसंपर्क ही परिमाणे मुलाखतीच्या केंद्रस्थानी होती. तथापि केवळ याच निकषावर उमेदवार निश्चित केला जाणार नसून, येथील ज्येष्ठ नेत्यांचा विचार घेतला जाणार आहे. मुलाखतीचा अहवाल प्रदेश कार्यकारणीकडे पाठवला जाणार असून, त्यानंतर तो अंतिम शिक्कामोर्तबासाठी केंद्रीय कार्यकारणीकडे सुपूर्द केला जाणार आहे. मध्यप्रदेश, राजस्थान येथे काँग्रेसच्या उमेदवारांना जनतेचा पाठिंबा मिळत असून, जनतेला परिवर्तन हवे आहे. या राज्यात काँग्रेसचा विजय निश्चित होणार असल्याचे ते म्हणाले. 

पत्रकार परिषदेस माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील,  आमदार सुधीर तांबे, चेतन चव्हाण यांच्यासह लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष  व्यंकट बेद्रे, लातूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष मोईज शेख,   व्यंकटेश पुरी, हरिराम कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.