Thu, Jul 18, 2019 02:47होमपेज › Marathwada › जि. प. च्या निर्णयावर न्यायालयाचे अंतरिम आदेश

जि. प. च्या निर्णयावर न्यायालयाचे अंतरिम आदेश

Published On: Jul 03 2018 1:53AM | Last Updated: Jul 02 2018 10:33PMबीड : प्रतिनिधी

प्राथमिक पदवीधर म्हणून दर्जावाढ मिळालेल्या शिक्षकांची अंतर जिल्हा बदली झाल्यानंतर त्यांना कार्यमुक्त करण्यापूर्वी पदावन्नत व्हावे लागते, परंतु बीड जिल्हा परिषदेने पदावन्नत होऊनही अंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांकडून दर्जावाढीनंतर मिळालेल्या अतिरिक्त वेतनाची वसुली करण्याचे आदेश पारीत करून मिळालेले वेतन परत जमा करे पर्यंत कार्यमुक्त केले जाणार नाही अशी भूमिका घेतली होती. याविरोधात एका शिक्षकाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी उच्च न्यायालयाने  अंतरिम आदेश पारित केले असून अंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकाकडून वेतन वसुली न करता त्यास कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.

बीड जिल्हा परिषदेतून अंतर जिल्हा बदलीने काही शिक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या. यामध्ये शिवाजी बिरकले या प्राथमिक पदवीधर शिक्षकाच्या बीड येथून औरंगाबाद जिल्हा परिषदेतील अंतर जिल्हा बदलीला राज्य शासनाने मान्यता दिली होती. परंतु त्यांना कार्यमुक्त करण्यापूर्वी  त्यांना पदावन्नत होणे अपेक्षीत होते, परंतु जि.प.ने त्यांच्या पगारातून 2 लाख 4 हजार 358 रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला त्यांनी  उच्च न्यायालयात आव्हान दिले. सदर याचिकेवर न्या. एस. व्ही. गंगापुरवाला व न्या. एस. के. कोतवाल यांच्या  खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यांनी जिल्हा परिषदेच्या त्या निर्णयावर अंतरिम आदेश पारित करून याचिकाकर्ते शिक्षक शिवाजी बिरकले यांच्याकडून कुठलीही वसुली न करता त्यांना कार्यमुक्त करण्यात यावे असे आदेश दिले आहेत. याचिकेवर पुढील सुनावणी पाच आठवड्यानंतर ठेवली आहे. याचिकाकर्त्यांच्या बाजूने अ‍ॅड. विलास सावंत यांनी काम पाहिले.