Tue, Mar 26, 2019 20:11होमपेज › Marathwada › अपुर्‍या मनुष्यबळाने पोलिसांची कसोटी

अपुर्‍या मनुष्यबळाने पोलिसांची कसोटी

Published On: Jun 11 2018 1:06AM | Last Updated: Jun 11 2018 12:46AMगेवराई : विनोद नरसाळे

शहरासह तालुक्यातील गावे, वाडी-वस्ती, तांड्यावरील कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणार्‍या गेवराईसह चकलांबा, तलवाडा पोलिस ठाण्यात सध्या रिक्त पदांचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. अपुर्‍या पोलिस यंत्रणेवर मोठा ताण पड़त असून गुन्हेगारी डोके वर काढत असल्याचे एकंदरीत चित्र आहे. दैनंदिन कामाने पोलिस परेशान असताना एसपींचे पथक मात्र एखादी कारवाई करून पाठ थोपटून घेण्यात दंग असल्याने येथील पोलिसांच्या मनोधैर्यावर परिणाम होत आहे.

तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्ते अपघात, जयंती-उत्सव कार्यक्रम बंदोबस्त, गावोगावी होणारे तंटे, हाणामारी, चोर्‍या आदी गुन्ह्यांचे तपास, पोलिस ठाणे तसेच वरिष्ठ कार्यालयातील कामे ही अपुर्‍या पोलिस यंत्रणेला घेऊन करावी लागत असल्याने ठाणेप्रमुखांची कसोटी लागत आहे.  

अपुरे कर्मचारी त्यातच दैनंदिन काम, रात्रीची पेट्रोलिंग यामध्ये स्थानिक पोलिसांचा दिनक्रम जात असल्याने या धावपळीत वाळू वाहतूक रोखण्यात पोलिसांना शक्य होत नाही, दरम्यान त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने वाळू माफियांचे चांगलेच फावत आहे, मात्र बीडहुन एसपींचे पथक गेवराई तालुक्यात येऊन अवैध वाळू वाहतुकीवर छोट-छोट्या कारवाया करून पाठ थोपटून घेण्यात दंग असल्याचे दिसते. तर बीडहून येऊन पोलिस कारवाया करतात. मग स्थानिक पोलिस काय करतात? यामध्ये स्थानिक पोलिस मात्र टीकेचे धनी होत आहेत, मात्र दैनंदिनी कामे आणि अपुर्‍या पोलिस यंत्रणेमुळे पोलिसांवर पडणारा अतिरिक्त ताण यामध्ये स्थानिक पोलिस यंत्रणेला दोष देणे चुकीचे असल्याचे सुज्ञ नागरिकांमधून बोलले जात आहे.

तिन्हीही पोलिस ठाण्याचा विस्तार मोठा

गेवराई पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेवराई शहरासह तब्बल 78 गावे, वाडी-वस्त्या, तांड्याचा समावेश आहे, तसेच चकलांबा पोलिस ठाण्याअंतर्गत 63 गावांचा समावेश आहे. तर तलवाडा पोलिस ठाण्यात अंतर्गत जवळपास साठहून अधिक गावे आहेत. तिन्हीही पोलिस ठाण्याचा विस्तार खूप मोठा आहे. त्यातच हद्दीतून जाणार्‍या दोन राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने अपघात होत असतात. शिवाय महामार्गावरून होणारी तस्करी रोखण्याचेही मोठे आवाहन पोलिसांसमोर असते, तसेच अनेक गावांत जाण्यासाठी व्यवस्थित रस्ते देखील नाहीत, तालुक्यात रोज काही ना काही गुन्हाच्या घडामोडी घडत असतात.

असे असताना येथे रिक्त पदाचा प्रश्‍न गंभीर बनला आहे, मात्र अपुर्‍या पोलिस यंत्रणेमुळे ठाणे प्रमुख पुरते हैराण झाले आहेत. तरीही अपुर्‍या पोलिस यंत्रणेवर देखील गेवराई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, चकलांबा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे व तलवाडा पोलिस ठाण्याचे प्रवीणकुमार बांगर हे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तारेवरची कसरत करत आहेत.