Thu, Jun 20, 2019 01:53होमपेज › Marathwada › कृषी योजनांची माहिती शेतकर्‍यांच्या ‘मोबाइल’वर

कृषी योजनांची माहिती शेतकर्‍यांच्या ‘मोबाइल’वर

Published On: May 01 2018 1:17AM | Last Updated: Apr 30 2018 10:14PMगेवराई : विनोद नरसाळे

कृषी भागात नोकरी करणारे अधिकारी-कर्मचारी फक्त कागदी घोडे धन्यता मानतात. प्रत्यक्षात शेतकर्‍यांना फायदा करून देण्यासाठी झटणारे कमीच दिसतात. पण गेवराई कृषी विभागात कृषी सहाय्यक म्हणून काम करणारे सुखदेव जमदाडे यांनी महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेच्या सहकार्याने कृषी विभाग बीड व कृषी विभाग नागपूर हे अ‍ॅप तयार केले असून या अ‍ॅपवर शासनाच्या शेतकर्‍यांसाठी असलेल्या विविध योजनाची माहिती मिळणार आहे. 

राज्यात आज घराघरात मोबाइल पोहोचला आहे. शेतकरी, शेतकर्‍यांची मुले आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करू लागली आहेत. आधुनिक व तंत्रज्ञानाची जोड ओढ असलेल्या शेतकर्‍यांना आधुनिक शेतीपयोगी यंत्र, साधनसामुग्री, शासनाच्या विविध योजना, कीड व रोगाचा प्रादुर्भाव, त्यावर नियंत्रणासाठी करायचे उपाय आदींची माहिती या अ‍ॅपच्या माध्यमातून शेतकर्‍यांना आता त्यांच्या मोबाइलवर मिळणार आहे. हे अ‍ॅप लाईव्ह स्वरुपाचे आहे. त्यामुळे त्याला अपडेट करायची गरज नाही. हवामानातील बदल, नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी आदींची माहिती शेतकर्‍यांना या अ‍ॅपवर अलर्ट पाठवून करण्यात आली आहे. या अ‍ॅपचे नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपुरात लोकार्पण झाले आहे, दरम्यान एका कृषी सहाय्यकाने तयार केलेले हे अ‍ॅप शेतकर्‍यांसाठी  कृषी मार्गदर्शिका ठरणार आहे.

अ‍ॅपची वैशिष्ट्ये

  • या अ‍ॅपमध्ये जिल्ह्यातील व तालुक्यातील कृषी विभागाशी संबंधित सर्व महत्त्वाचे अधिकारी, कर्मचारी यांचे संपर्क क्रमांक उपलब्ध असून कृषी तज्ञ व कृषी विद्यापीठांचे संपर्क क्रमांक शेतकर्‍यांना मार्गदर्शन घेण्यासाठी देण्यात आले आहेत.
  •  या अ‍ॅपमध्ये कृषी विभागाचे मासिक संदेश शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्याची सोय आहे.
  •  कृषी विज्ञान केंद्राकडून प्रसारीत केली जाणारी माहिती असणार आहे.
  •  जिल्ह्यात कृषी विभागात होणार्‍या महत्वाच्या घडामोडी, मार्गदर्शन शिबिरे यांचा वृत्तांत तसेच कृषी विभागाचे महत्त्वाचे जीआर यावर उपलब्ध होतील 
  •  कृषी विभागातर्फे शेतकर्‍यांसाठी राबविण्यात येणार्‍या नाविन्यपूर्ण योजनांची माहिती यावर मिळेल.

उत्साह वाढविण्यासाठी प्रेरणादायी यशोगाथा

शेती परवडत नाही, अशी सर्वसाधारण ओरड आहे. त्यामुळे युवकांचा शेतीकडे ओढा कमी झाला आहे. यामुळे आलेली उदासिनता दूर करण्यासाठी प्रगतशील शेतकर्‍यांनी त्यांच्या शेतीत केलेले यशस्वी प्रयोग, भरघोस घेतलेले उत्पादन, कमी खर्चात केलेली शेती, जलव्यवस्थापन आदी प्रेरणादायी यशोगाथा शेतकर्‍यांचा उत्साह वाढविण्यासाठी या अ‍ॅपद्वारे मांडले जाणार आहेत. 

कृषी विभाग, बीड या अ‍ॅपच्या माध्यमातून शेतकर्‍यांना त्यांच्या मोबाइलवर तांत्रिक व शास्त्रीय माहिती उपलब्ध झाल्याने पिकांचे नियोजन व व्यवस्थापन करणे सोईस्कर होईल. त्याबरोबर कृषी विभागामार्फत राबविल्या जाणार्‍या योजनांची माहितीही दिली जाणार असल्याने योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकर्‍यांना सहभाग घेता येईल.        

गणेश श्रीखंडे, उपविभागीय कृषी अधिकारी.