Wed, May 22, 2019 10:36होमपेज › Marathwada › भारतीय सैन्यातील सुभेदार मुरलीधर शिंदेंवर अंत्यसंस्कार 

भारतीय सैन्यातील सुभेदार मुरलीधर शिंदेंवर अंत्यसंस्कार 

Published On: Dec 03 2017 6:04PM | Last Updated: Dec 03 2017 5:32PM

बुकमार्क करा

परळी वैजनाथ : प्रतिनिधी

परळी येथील जवान मुरलीधर शिंदें चंदीगड येथे कार्यरत असताना त्यांचे शनिवारी (दि. 2) रोजी  पहाटे चंदीगढ येथील रूग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर परळीत आज (दि. ३) दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी पोलीस दलाच्या वतीने त्यांना अखेरची मानवंदना देण्यात आली.  

भारतीय सैन्यात रॉकेट रेजीमेंटरी मध्ये सुभेदार पदावर कार्यरत असलेले मुरलीधर बाबुराव शिंदे रा.परळी वैजनाथ यांचे चंदीगड येथे कर्तव्य बजावत असताना निधन झाले. सकाळी त्यांचे पार्थिव परळीत दाखल झाले. त्यानंतर त्यांचा अंत्यविधी  परळी येथे मोक्षधाम स्मशानभूमीत करण्यात आला. परळी येथील आयोध्यानगर मधील निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघाली. त्यांचे आई, चार भाउ, पत्नी, दोन मुले  या कुटुंबियांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर शहर व परिसरातील नातेवाईक, नागरिकांनी अंत्यदर्शन घेतले. लष्करातील सेवा करणाऱ्या या जवानाच्या निधनाने सर्वरस्तरातून शोकभावना व्यक्त होत आहे. 

वीरजवानाला अखेरचा जयहिंद......

दरम्यान भारतीय सैन्यातील सुभेदार मुरलीधर शिंदेंवर परळीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी तिरंग्यात लपेटलेल्या पार्थिवावर भावपूर्ण पुष्प अर्पण करून पोलीसदलाच्या विशेष तुकडीने या वीर जवानाला सैनिकी शिष्टाचाराला अनुसरून मानवंदना दिली. यावेळी प्रशासकीय, विविध सामाजिक स्तरातील नागरिक, नातेवाईक व पोलीस कर्मचारी या सर्वांनी भारतमातेच्या या वीरजवानाला साश्रुनयनांनी  अखेरचा जयहिंद करून मानवंदना दिली. 

पालकमंञी ना. पंकजा मुंडे व  खा. डॉ प्रितम मुंडे यांनी व्यक्त केल्या शोकभावना.....

सुभेदार मुरलीधर शिंदे यांच्या दुःखद निधनाबद्दल राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंञी ना. पंकजा मुंडे व खा. डॉ. प्रितम मुंडे यांनी शोक व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. 

 पालकमंत्र्यांच्या वतीने स्वीय सहाय्यक पंढरीनाथ बडे, भाजपचे शहर सरचिटणीस उमेश खाडे यांनी पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. भाजप नेते शेख अब्दुल करीम यावेळी उपस्थित होते.