Thu, Jun 20, 2019 00:57होमपेज › Marathwada › आवक घटल्याने आंबा खातोय भाव  

आवक घटल्याने आंबा खातोय भाव  

Published On: Apr 25 2018 12:57AM | Last Updated: Apr 24 2018 10:37PMपूर्णा : सतीश टाकळकर 

उन्हाळ्याची  चाहूल लागताच आंब्याची चव घेण्यासाठी सर्वच आतूर असतात. आवक घटल्याने आंब्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांकडून काहीशी नाराजी व्यक्‍त करण्यात येत आहे. सध्या आंध्र प्रदेशातून आंब्यांची आवक होत आहे. बाजारात विविध प्रजाती व किमतीचे आंबे अगदी स्वस्त दरात मिळत होते. मागील हंगामाचा विचार केल्यास यंदा फळांची आवक कमी असल्याने ग्राहकांना पंसतीचे आंबे मिळणे कठीण झाले आहे.

मध्यंतरी झालेली गारपीट तसेच प्रतिकूल वातावरणामुळे आंबा बागांचे मोठे नुकसान झाले आहे. सुलतानी संकटामुळे आंबा उत्पादकांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे परिणामी आंब्याची आवक घटली असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या  वर्षी दहशरी , बेनिशान ,केशर गावरान आंब्यांनी बाजारपेठ फुलून गेली होती. मात्र यंदा बेनिशान  आंब्याव्यतिरिक्‍त अन्य प्रजातींची फळे आली नाहीत. मागील वर्षी दशहरी व अन्य आंबे साठ ते सत्तर आणि अखेरीस तीस रुपये किलो दराने मुबलक उपलब्ध झाले होते. त्यामुळे ग्राहकांना आंब्यांची चव चाखता आली, परंतु यंदा अजूनही बाजारात विविध प्रकारचा आंबा मुबलक व वाजवी दराने उपलब्ध होत नसल्याने ग्राहकांना खरेदी करण्यासाठी विचार करावा लागत आहे. सध्या बेनिशान  हा आंबा बाजारात दिसत आहे. त्याचा भाव 100 रुपये आहे. सध्या आंध्र प्रदेशातूनच आवक होत असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात आले आहे. तसेच समाधानकारक बहर आला नसल्याने आंबा उत्पादकांकडूनही चिंता व्यक्‍त करण्यात येत आहे. याचा मोठ्या प्रमाणात आर्थिक परिणाम होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

गावरान आंब्याची प्रतीक्षा; आंध्रप्रदेशातून होतेय आवक  

वादळी तडाख्याचा परिणाम : यावर्षी फेब्रुवारी, मार्च महिन्यांत पाऊस व गारपीट, वादळी तडाख्याने आंब्याची आवक कमी झाली आहे. आंध्रप्रदेशातून आवक होत असून येत्या काही दिवसांत गावरानी केशर, लालबाग या आब्यांची काही प्रमाणात आवक वाढेल.    

शेख महंमद हुसेन, फळ विक्रेता, पूर्णा.
 

Tags : Purna, mango,  rates Increased,