Mon, May 20, 2019 07:59होमपेज › Marathwada › संविधानच देशाचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ : गायकवाड

संविधानच देशाचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ : गायकवाड

Published On: Jul 23 2018 1:09AM | Last Updated: Jul 22 2018 11:22PMपरभणी : प्रतिनिधी

सिध्दार्थ गौतम बुध्द यांच्या विचाराने मानवी समाजात प्रेमभावना रुजण्यास सुरुवात झाली. समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व हे प्रज्ञा, शील, करुणेच्या माध्यमातून बुध्दांनी रुजविले आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातील वास्तववादी विद्यापीठ म्हणजेच गौतम बुध्दांची विचारसरणी आहे. त्याच विचारांची कास धरून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केली आहे आणि त्याच संविधानामुळे देशात लोकशाही टिकून आहे. त्यामुळे संविधान हाच देशाचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे, असे प्रतिपादन माजी खा.एकनाथ गायकवाड यांनी केले. 

बौध्द साहित्य परिषदेतर्फे 22 जुलै रोजी शहरातील बी.रघुनाथ सभागृहात आयोजित 5 व्या बौध्द साहित्य संमेलनाचे उद्घाटन गायकवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. विचारपीठावर संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे, माजीमंत्री सुरेश वरपुडकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बी.एच.सहजराव, लियाकत अन्सारी, संबोधी अकादमीचे संस्थापक अध्यक्ष भीमराव हत्तीअंबीरे, स्वागताध्यक्ष सिध्दार्थ हत्तीअंबीरे, कमलाकर कांबळे, शंकरराव वाघमारे, प्राचार्य डॉ.शिवाजी दळणर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

गायकवाड म्हणाले की,  साहित्यिकांनी जातीवर आधारित वर्गीकरण न करता ते विचाराने करावे. साहित्यिकांनी दोन ओळींच्या आतील तत्त्वज्ञान समाजाला सांगण्यासाठी दर्जेदार साहित्याची निर्मिती करावी. योगीराज वाघमारे यांनी  जिल्ह्याचे विविध क्षेत्रांतील असलेले  योगदान स्पष्ट केले. डॉ.संजय जाधव लिखित बुध्द प्रवाह या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल भीमराव हत्तीअंबीरे यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.

प्रास्ताविक संयोजक डॉ.संजय जाधव  यांनी केले.स्वागताध्यक्ष हत्तीअंबीरे, कांबळे, वरपुडकर, अन्सारी यांनी मनोगत व्यक्त करताना बौध्द संस्कृती व साहित्याने विश्‍वात मानवतवादी विचारांची रुजवण केली आहे. त्यांचा संदेश विचार समाजातील तळगळापर्यंत पोहचविण्याचे काम साहित्यिकांचे असल्याचा मनोदय व्यक्त केला.   सूत्रसंचालन प्रा.सुनील तुरुकमाने यांनी केले.